विजयदुर्ग नळपाणी योजना ठप्प; प्रशासनासह लोकप्रतिनिधीही गप्प!

विजयदुर्ग नळपाणी योजना ठप्प; प्रशासनासह लोकप्रतिनिधीही गप्प!

संग्रहित छायाचित्र

सिंधुदुर्ग – देवगड तालुक्यातील विजयदुर्ग भागातील 12 गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेली विजयदुर्ग प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना ठप्प पडल्याने अनेक ग्रामस्थांचे गेल्या काही दिवसांपासून पाण्याविना हाल होत असल्याचे चित्र आहे. हक्काची नळ पाणी पुरवठा योजना बंद पडल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असून आमच्या समस्यांकडे कुणी लक्ष देणार का, अशी ओरड सध्या ग्रामस्थ करत आहेत. विशेष म्हणजे 15 दिवस उलटल्यानंतरही येथील पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी कोणत्याही हालचाली होत असल्याचे पाहायला मिळत नसल्याने प्रशासनासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी या प्रश्नावर अद्याप गप्प का आहेत, असा सवाल येथील ग्रामस्थांना पडला आहे.

विजयदुर्ग भागामध्ये पाण्याचे स्त्रोत नसल्याने ग्रामस्थांना पाणी उपलब्ध होत नसल्याने याठिकाणी नळ पाणी योजना सुरू करण्यात आली होती. या नळ योजनेशिवाय ग्रामस्थांना पाण्याचा इतर पर्याय नाही. या योजनेद्वारे होणार्‍या पाणीपुरवठ्यावरच विजयदुर्ग येथील गीर्ये, सौंदाळे, मुटाट राणेवाडी, मणचे, ठाकूरवाडी, रामेश्वर, पडेल, वाघोटन, पाळेकरवाडी, तिरलोट, बापर्डे आदी गावे अवलंबून आहेत, परंतु जवळपास गेल्या 15 दिवसांपासून येथील पाणी पुरवठा होणे बंद झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सदर पाणीपुरवठा ठप्प झाला तरी प्रशासनाकडून कोणतीही सूचना देण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. याबाबत पाळेकरवाडी येथील ग्रामस्थांनी प्रशासनदरबारी पाठपुरावा केला असता पाणीपुरवठा करणार्‍या पंपाचा वीजपुरवठा बंद झाल्याने ही वेळ ओढवल्याचे समजले.

सदर योजनेचे 40 लाख रूपये थकित असल्याने पाणी पुरवठा करणार्‍या पंपाचा वीजपुरवठा बंद करण्यात आल्याचे ग्रामस्थांना समजले. याअनुषंगाने तालुका स्तरावर विचारणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला असता काही अधिकारी फोनही उचलत नाहीत. काही अधिकार्‍यांनी फोन उचललाच तर याबाबत अधिकारी जिल्हा स्तरावर विचारणा करण्याचे नुसते सल्ले देण्याचे काम करतात, असे पाळेकरवाडीचे सरपंच काशिराम पाळेकर यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, ग्रामस्थ थेट जिल्हा स्तरावर अधिकारी वर्गाला भेटायला गेले असता त्यांनी जोपर्यंत थकीत बिल भरणा केल्याशिवाय पाणी पुरवठा करता येत नाही, असे सांगितले.

त्यानंतर या योजनेच्या ठेकेदाराशी संपर्क केला असता, आमच्या नोकरदार माणसांचे पगार अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे या विषयावर आम्ही काही बोलू शकत नाही, अशी उत्तरे देण्यात आली, परंतु पाळेकरवाडी गाव आणि मुटाट राणेवाडीचा वीजबिल भरणा थकीत नसताना आम्हाला का पाण्याविना वंचित राहावे लागते, असा प्रश्न आम्ही केला असता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकार्‍यांनी वरच्या स्तरावरून निधी उपलब्ध झाल्यास तो निधी थकीत असलेला वीजबिल भरणा करण्यासाठी वापरण्यात येईल, असे सांगितले.

हे म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी देण्यासारखाचा प्रकार आहे. काही गावांनी वीजबिलाचा भरणा केल्यानंतरही त्या गावांना केवळ इतरांचा वीजबिल भरणा थकित असल्याने पाणीपुरवठ्यापासून वंचित ठेवणे म्हणजे पूर्णपणे अन्यायकारक असून काही जणांमुळे केवळ इतरांना शिक्षा देण्यासारखेचे आहेत. याबाबत अनेक लोकप्रतिनिधींकडे आम्ही पाठपुरावा केला. याबाबत लवकरच दखल घेण्यात येईल इतकेच उत्तर त्यांच्याकडून आम्हाला मिळाले, परंतु आमच्या समस्या सोडविण्यासाठी कुणीही पुढाकार घेतलेला नाही. सर्वपक्षीय नेते याबाबत गप्प मौन बाळगून आहेत, असे पाळेकर यांनी सांगितले.

यासंदर्भात आमचा पाठपुरावा सुरु आहे. एमएससीबीने बिल न भरल्याने पाण्याची लाईन कट करण्यात आली आहे. परंतु पुढील दोन ते तीन दिवसात हा पाणी पुरवठा सुरळीत होईल.
– भाजप आमदार, नितेश राणे
या संदर्भात आमचा सरकारकडे पाठपुरावा सुरू असून, लवकरात लवकर नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासंदर्भात प्रयत्न केला जात आहे. 
– ठाकरे गटाचे नेते, खासदार विनायक राऊत
First Published on: February 16, 2023 9:15 PM
Exit mobile version