राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी मिळणार?, पोलीस नोटीस देण्याची शक्यता

राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी मिळणार?, पोलीस नोटीस देण्याची शक्यता

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण, पायावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलली

औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. परंतु या सभेला अद्याप औरंगाबाद पोलीस आयुक्तांकडून परवानगी देण्यात आली नाही. आज औरंगाबाद पोलीस आयुक्त राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देतील अशी शक्यता आहे. काही अटींच्या आधारावर परवानगी मिळू शकते. सभेदरम्यान ध्वनी प्रदूषण आणि निर्धारित नियमांनुसार आवाजाची मर्यादा पाळावी लागणार आहे. सभेला परवानगी देण्यात आली नसली तरी औरंगाबादमधील मनसैनिकांनी सभेची जय्यत तयारी सुरु केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. मशिदींवरील भोंग्यांच्या अल्टिमेटनंतर राज ठाकरे या सभेमध्ये काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरेंची सभा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. सामाजिक तेढ निर्माण होणार नाही असे भाषण करु नये, सभेदरम्यान आवाजाची मर्यादा पाळावी अशी नोटीस औरंगाबाद पोलिसांकडून राज ठाकरेंना देण्यात येऊ शकते. मनसे नेते बाळा नांदगावकर औरंगाबादमध्ये दाखल झाले असून राज ठाकरे शुक्रवारी पुणे दौऱ्यावर असतील. पुण्यातूनच राज ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

सभेसाठी जय्यत तयारी सुरु

राज ठाकरेंच्या सभेसाठी जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. औरंगाबाद भगवेमय करण्यासाठी मनसेचे झेंडे तयार करण्यात आले आहेत. निमंत्रण पत्रिका देखील छापण्यात आल्या आहेत. कला क्रिडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरेंची सभा होणार आहे. औरंगाबादमधील मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून प्रत्येकजण सभेच्या तयारीमध्ये व्यस्त आहे.

राज ठाकरेंच्या सभेबाबत पोलीस निर्णय घेतील – गृहमंत्री

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्याबाबत औरंगाबाद पोलीस आयुक्त निर्णय घेतील. पोलीस आयुक्त सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करुन सभेला परवानगी देण्याबाबत निर्णय घेतील. राज्य सरकारचा यामध्ये कोणताही हस्तक्षेप नाही. जिल्हा पातळीवरील आढावा घेऊन पोलीस आयुक्त निर्णय घेतील अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. तसेच समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य टाळण्याचा सल्लासुद्धा गृहमंत्र्यांनी राज ठाकरेंना दिला आहे.


हेही वाचा : आठवड्याभरात ‘समृद्धी’वर दुसरी दुर्घटना; निर्माणाधीन पुलाचा भाग कोसळला

First Published on: April 28, 2022 8:56 AM
Exit mobile version