सिंधुदुर्गातील सिलिका उत्खनन वादावर तात्पुरता पडदा

सिंधुदुर्गातील सिलिका उत्खनन वादावर तात्पुरता पडदा

सिलिका उत्खनन

सिलिका उत्खनन करून त्याची वाहतूक बेकायदेशीररीत्या खासगी जमिनीतून होत असल्याप्रकरणी शेतकरी आणि उत्खनन करणारी कपंनी प्रतिनिधी तसेच तेथील काही शेतकरी यांच्यात वादंग झाला होता. हा वाद जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मध्यस्तीने तात्पुरता मिटवण्यात आला आहे. पुढील दोन दिवसात शेतकरी, एक्समो ट्रेडिंग कंपनी, खनिकर्म अधिकारी यांची तहसीलदारांसमोर बैठक होणार आहे. या बैठकीत या प्रश्‍नावर सर्वानुमते तोडगा काढण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.

ऊस लागवड क्षेत्रातून रस्ता काढण्यात आला

कणकवली तालुक्यातील लोरे येथे गेल्या अनेक वर्षांपासून सिलिका उत्खनन होत आहे. तर त्याच परिसरात ऊस शेती करण्यात आली आहे. या दोन्ही जमिनी स्थानिक शेतकऱ्यांनी भाडे तत्त्वावर दिल्या आहेत. यात सिलिका उत्खनन करणारी कंपनी, सिलिकासाठी भाडेतत्त्वावर जागा देणारे जमीन मालक तसेच ऊस लागवडी जमीन भाडे पट्ट्याने देणारे शेतकरी यांच्यात वादंग होत आहेत. असाच वाद लोरे येथे घडला होता. ऊस लागवड क्षेत्रातून रस्ता काढण्यात आला आणि त्यामधून सिलिका वाहतूक केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता.

जिल्हा बँक अध्यक्षांची पोलिसात धाव

या वादात पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर लोरे आरोप-प्रत्यारोप रंगले होते. तसेच वादंगाचीही स्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी लोरे येथील शेतकऱ्यांसमवेत येथील पोलीस ठाण्यात काल सायंकाळी धाव घेतली. तेथे सुमारे दीड तास या मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर ऊस लागवड केलेले शेतकरी, एक्समो कंपनीचे मालक, खनिकर्म अधिकारी, भाडे तत्त्वावर जमीन दिलेले शेतकरी यांची संयुक्त बैठक दोन दिवसांत घेऊन या प्रश्‍नावर ठोस भूमिका घेण्याच्या मुद्दयावर एकमत झाले.

First Published on: December 16, 2018 7:13 PM
Exit mobile version