नाशिकमध्ये लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार

नाशिकमध्ये लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार

पालकमंत्री छगन भुजबळ यांची माहिती

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले जाणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. या महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर हे दोन्ही अभ्यासक्रम एकत्रितपणे सुरू करण्यात येतील. तसेच, विद्यापीठाकडून आयुर्वेद, होमिओपॅथी व फिजिओथेरपी अभ्यासक्रम चालवले जातील, असेही त्यांनी सांगितले.

नवीन महाविद्यालय व रुग्णालय स्थापन करण्यासाठी मंत्रालयात बुधवारी (दि.12)बैठक पार पडली. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे केंद्र शासनाने धोरण आखले आहे. त्यानुसार नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रांगणात ते सुरू केले जाणार असून, जिल्हा शासकीय रुग्णालयाशी संलग्न करण्यात येईल. वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यात तीन वर्षांसाठी रुग्णालय हस्तांतरण करार करण्यात येईल.

शासकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळापुढे मांडण्यात येणार असल्याचे भुजबळ म्हणाले. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

First Published on: February 13, 2020 6:43 AM
Exit mobile version