तलवारीचा धाक दाखवून भामट्यांनी पळवली मोटार

तलवारीचा धाक दाखवून भामट्यांनी पळवली मोटार

तलवारीचा धाक दाखवून भामट्यांनी पळवली मोटार

उद्योगनगरीत वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. तलवारीचा धाक दाखवून चारचाकी वाहन पळवून नेल्याची घटना रविवारी पहाटे थरमॅक्स चौकात घडली. त्यानंतर, पाच बिट मार्शल पथकांनी चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी आप्पासाहेब देवकाते (वय २९, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – आंदोलनाचा ‘हाँगकाँग पॅटर्न’


काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवकाते त्यांच्या इंडिका कार मध्ये रविवारी पहाटे थरमॅक्स चौकात झोपले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी देवकाते यांना शिवीगाळ करून, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तलवारीचा धाक दाखवून देवकाते यांची कार पळवून नेली. ओटास्किम बीट मार्शल व यमुनानगर, अजंठानगर मार्शलचे पोलीस कर्मचारी नंदुर्गे यांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती तात्काळ पिंपरी चिंचवड नियंत्रण कक्षाला कळवली. चोरटे कारसह चिंचवडच्या दिशेने जात असल्याचे सांगण्यात आले. तांत्रिक माहितीच्या आधारे प्राधिकरण बिट मार्शलला चिंचवड रस्त्यावर थांबवण्यात आले. प्राधिकरण बिट मर्शलला देखील पार करून चोरटे चिंचवडच्या दिशेने जाऊ लागले. पोलिसांनी वाल्हेकरवाडी आणि चिंचवडगाव बिट मार्शलला याबाबत माहिती दिली. पाच बिट मार्शल एकाच वेळी चोरट्यांचा पाठलाग करत होते. अखेर काही मिनिटांमध्ये चिंचवड येथे हनुमानस्वीट जवळ हा पाठलाग संपला. पोलिसांनी चोरून नेलेल्या कारसह चार चोरट्यांना पहाटे पावणेचारच्या सुमारास ताब्यात घेतले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

First Published on: December 23, 2019 9:51 PM
Exit mobile version