हा वाद केवळ लक्ष विचलित करण्यासाठी; सुषमा अंधारेंची भाजपावर टीका

हा वाद केवळ लक्ष विचलित करण्यासाठी; सुषमा अंधारेंची भाजपावर टीका

भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांविरोधात जे वक्तव्य केले त्याविरोधात राज्यभर आंदोलने केली जात आहेत. भाजपने सुद्धा राहुल गांधींविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यावरूनच आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर चांगलाच निशाणा साधला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव सोयीनुसार वापरले जाते असा आरोपसुद्धा सुषमा अंधारे यांनी केला.

याच संदर्भांत सुषमा अंधारे म्हणाल्या, द्वेषमूलक राजकारण पसरवले जात आहे. या द्वेषमूलक राजकारणामध्ये जाती आणि धर्म एकमेकांना हरवण्याच्या नादात माणूसकी हरली आहे. हाच महत्त्वाचा विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. त्याचसोबत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेले विधान आणि त्यानंतर सुरू झालेला नवा वाद यावरही अंधारे म्हणाल्या, हा वाद फक्त लक्ष विचलित करण्यासाठी केला जात आहे. भाजपाला सावरकरांविषयी खरंच प्रेम वाटत असते, तर आतापर्यंत भाजपाने सावरकरांना भारतरत्न दिला असता, असा टोलासुद्धा सुषमा अंधारे यांनी लगावला.

सोयीनुसार सावरकरांचे नाव वापरायचे आणि राजकारण करायचे

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव सोयीनुसार पावरून राजकारण करायचे हा भाजपचा खेळ आहे. अनेक मुद्दे आहेत, जेव्हा भाजपा कुठेच दिसत नाही. लोकांच्या जीवन – मरणाचा प्रश्न असतो, तेव्हा हे येत नाहीत. पण, जेव्हा जेव्हा यांना वाटते की, यांचे अपयश उघडे पडत आहे, तेव्हा ते वादंग करण्यासाठी झटकन पुढे येतात, अशी बोचरी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

महाप्रबोधन यात्रेवर टीका करताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी, चंद्रकांत खैरे आऊड-डेटेड झालेले आहेत. म्हणूनच सुषमा अंधारे यांना आणले आहे, अशी टीका केली होती. त्यालाही अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले, संदीप देशपांडे यांच्यासारख्या कोणत्या आऊड-डेटेड माणसाचा प्रश्न विचारता, असा सवाल करत, अशा लोकांना उत्तरेही देऊ नये. राहिला प्रश्न चंद्रकांत खैरे यांचा ते ज्येष्ठ आहेत आणि ज्येष्ठच राहणार, असा पलटवार सुद्धा सुषमा अंधारे यांनी लगावला.


हे ही वाचा –  विशेष भाग ८ : आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे लहान मुलांमध्ये वाढतो एकटेपणा

First Published on: November 19, 2022 3:56 PM
Exit mobile version