घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रविशेष भाग ८ : आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे लहान मुलांमध्ये वाढतो एकटेपणा

विशेष भाग ८ : आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे लहान मुलांमध्ये वाढतो एकटेपणा

Subscribe

नाशिक : घटस्फोटित दांपत्यांच्या लहान मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर दूरगामी परिणाम होत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशक आणि वकीलांशी ‘आपलं महानगर’ने चर्चा केल्यावर पुढे आले आहे. या मुलांमध्ये एकटेपणा वाढून त्यांच्यात नैराश्याची भावना, चिडचिडेपणा निर्माण होतो. विशेष म्हणजे, विभक्त कुटुंब व एकल पालकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यास मुलांना सर्वाधिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचेही समुपदेशकांनी सांगितले.

घटस्फोटीत दांपत्यांच्या काही मुलांवर दीर्घकालीन परिणाम होतात. घटस्फोटामुळे केवळ एका नात्याचा शेवट होत नाही, मुलांमधील पालकांबद्दलचे प्रेमही कमी होते. ही मुले मूडी बनतात. घटस्फोटामुळे आई किंवा वडिलांकडून मुलांचा सांभाळ करणे कठीण होते. घटस्फोटामुळे घरातील वातावरण अस्वस्थ होते. त्यातून कुटुंबातील सर्वच तणावग्रस्त होतात. ही भावना मुलांच्या मनात वाढते आणि लहान मुलांच्या बाबतीत लढणे कठीण होते.

- Advertisement -

मुलांवर घटस्फोटाचा सर्वात सामान्य मानसिक परिणाम म्हणजे तणाव. कधीकधी मुले स्वत:ला घटस्फोटाचे कारण समजण्यास सुरुवात करतात. त्यातून ते तणावात राहू लागतात. तणावामुळे मुले मूडी वर्तन करतात. त्यांना जीवनशैलीनुसार जगणे कठीण होते. मूडी मुले आपला राग इतरांवर काढताना दिसतात. अखेरीस मित्र बनवण्यात आणि समाजात अडचण येते. जेव्हा एखाद्या मुलाने पाहिले की त्याच्या आई-वडिलांचे लग्न टिकले नाही, तेव्हा तो विश्वास करू लागतो की नातेसंबंध कसे कार्य करतात. त्यांच्या जीवनात येणार्‍या कोणावरही विश्वास ठेवणे त्याला अवघड वाटते. विशेष म्हणजे, घटस्फोटानंतर मुलाला आई किंवा वडिलांचा पुनर्विवाह मान्य करणे कठीण जाते. त्याला सावत्र आई किंवा सावत्र वडिलांना कुटुंबाचा एक भाग म्हणून स्वीकारणे अवघड होते. कधीकधी नवीन पालक खरोखर मैत्रीपूर्ण आणि समजून घेत आधार देणारे असू शकतात. परंतु, तसे नसेल तर भविष्यात काही गंभीर समस्या निर्माण होतात.

मुलांवर होणारे मुख्य परिणाम
  • अभ्यासात मन न लागणे
  • एकाग्रता कमी होणे
  • सतत चिडचिड करणे
  • हट्टीपणा वाढणे
  •  समवयस्क मुलांसोबत भांडत राहणे
  • आईवडिलांच्या सूचना न ऐकणे
  • छोट्या-छोट्या गोष्टींवरून राग येणे
  • नातेवाईकांपासून दूर राहणे
  • आवडती कामे न करणे
  • व्यसन लागणे
  • स्वतःला इजा करून घेणे
  • झोप न येणे किंवा प्रचंड प्रमाणात झोप येणे
  • खाण्यापिण्याची इच्छा न होणे किंवा अधिक प्रमाणात खाणे

आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याने मुलांमध्ये असुरक्षितपणा, अविश्वास, एकटेपणा, चीडचीडेपणा येत आहे. मुलांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. सर्वाधिक त्रास विभक्त कुटुंबातील जोडप्याने घटस्फोट घेतला तर मुलांना होस्टेल किंवा नातेवाईकांकडे रहावे लागते. ते आयुष्यभर आई-वडिलांना दोषी ठरवतात. पती-पत्नीने दूरगामी विचार करुनच घटस्फोटाचा निर्णय घ्यावा. : डॉ. उमेश नागापूरकर, मानसोपचार तज्ज्ञ

घटस्फोटांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. घटस्फोट घेणे हा काही शेवटचा पर्याय नाही. पती-पत्नीने एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे. मुलांवर होणारा परिणामांचा विचार केला पाहिजे. पत्नी व पत्नी एकमेकांच्या आवडीनिवडी जोपासल्या पाहिजे. दोघांनी एकमेकांना वेळ दिला पाहिजे. त्यातून पती-पत्नीमधील वाद कमी होतील. : हेमंत गायकवाड, वकील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -