याचा हाच अर्थ… ठाकरेंची मूक सहमती आहे, सुषमा अंधारेंच्या वक्तव्यावरून नितेश राणेंची टीका

याचा हाच अर्थ… ठाकरेंची मूक सहमती आहे, सुषमा अंधारेंच्या वक्तव्यावरून नितेश राणेंची टीका

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आक्रमक नेत्या सुषमा अंधारे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. यावरून भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

सुषमा अंधारे यांच्या रडारवर भाजपा, शिंदे गट आणि मनसे आहेत. जनप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून त्यांनी भाजपा, शिंदे गट आणि मनसेच्या नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्याला या तिघांनीही प्रत्युत्तर दिले. मात्र त्याचवेळी सुषमा अंधारे यांनी संत आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या.

विश्व वारकरी संघाने आपल्या पदाधिकाऱ्यांना सुषमा अंधारे यांच्याविरोधात गावोगावी पोलिसांत तक्रार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुषमा अंधारे ज्या पक्षात असतील, त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ वारकऱ्यांनी घेतली. त्यानंतर अंधारे यांनी आपल्या विधानांबाबत माफी मागितली. तरीही वारकरी संघटनेचे समाधान झालेले नाही. राज्यभरात सुषमा अंधारे यांच्याविरोधात आंदोलने सुरू असून ठाणे, डोंबिवलीसह अनेक भागात बंद पुकारण्यात आला आहे.

यावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अंधारे यांना विरोध होऊनही, हिंदू देवीदेवता आणि महान संतांबद्दल अंधारे यांनी गरळ ओकण्याचे पुरावे समोर आल्यानंतरही उद्धव ठाकरे त्यांचे साधे निलंबन करत नाहीत किंवा राजीनामा द्यायला सांगत नाहीत. याचा हाच अर्थ की, ठाकरेंची याला मूक सहमती आहे, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

हेही वाचा – अमोल मिटकरींकडून भाजपा नेत्यांना आव्हान, ‘तो’ फोटो शेअर केल्यास देणार एक लाख रुपये

First Published on: December 17, 2022 12:49 PM
Exit mobile version