इंदुरीकर महाराजांचा तो व्हिडिओ युट्युब परवानगीनेच प्रसारित

इंदुरीकर महाराजांचा तो व्हिडिओ युट्युब परवानगीनेच प्रसारित

इंदुरीकर महाराज

युट्युबवर प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडिओशी आपला संबंध नसून, ते प्रसारित करताना युट्यूूब चॅनेलवाल्यांनी आपली परवानगी घेतली नव्हती, त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी घेतली आहे. पण हे व्हिडिओ आम्ही कीर्तनाचे आयोजन करणार्‍या आयोजकांच्या परवानगीनेच प्रसारित केल्याचा दावा युट्यूब चॅनेलवाल्यांनी केला आहे. त्यामुळे आता इंदुरीकर महाराज कोणाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.

इंदुरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनातून ‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते, असे विधान केले होते. या विधानाने इंदुरीकर यांनी गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करून गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याने अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सक तथा जिल्हा समुचित प्राधिकारी यांनी इंदुरीकर महाराजांविरोधात नोटीस बजावली.

पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22 चे उल्लंघन झाल्याने इंदुरीकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे इदुंरीकर यांनी व्हिडिओ प्रसारित करताना युट्यूब चॅनेलवाल्यांनी आपली परवानगी घेतली नव्हती. म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. कीर्तनाचे व्हिडिओ युट्यूबवर प्रसारित करण्यासंदर्भात आमची आणि इंदुरीकर महाराज यांच्यामध्ये कोणताच संवाद, चर्चा व करार झाला नाही.

परंतु व्हिडिओ प्रसारित करण्यासंदर्भात आम्हाला कीर्तनाचे आयोजकांनी परवानगी दिली आहे. आयोजकांच्या परवानगीनेच आम्ही कीर्तनाचे व्हिडिओ युट्यूबवर प्रसारित केले असल्याचे युट्यूब चॅनेलवाल्यांकडून येत आहे. त्यामुळे आता लाखोंची बिदागी देणार्‍या आयोजकांविरोधात इंदुरीकर महाराज कायदेशीर कारवाई करण्याबाबत निर्णय घेणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

First Published on: February 15, 2020 6:58 AM
Exit mobile version