काँग्रेसमध्ये थोरात विरुद्ध पटोले संघर्ष

काँग्रेसमध्ये थोरात विरुद्ध पटोले संघर्ष

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर मनमानीपणाचा आरोप केल्यानंतर अवघ्या २४ तासात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा देऊन पटोलेंच्या विरोधात निर्णायक पवित्रा घेतला. थोरात यांनी आपला राजीनामा दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींना पाठवला असून हा राजीनामा मागे घ्यावा, यासाठी त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत, तर नाना पटोले यांनी थोरात यांच्या राजीनाम्याबाबत मौन पाळत त्यांच्या याविषयी माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, थोरातांच्या राजीनामा पत्रामुळे काँग्रेसमधील थोरात विरुद्ध पटोले संघर्षाला धार चढली आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपासून बाळासाहेब थोरात आणि पटोले यांच्यात सुरू असलेले शीतयुद्ध आता विकोपाला पोहोचले आहे. पक्षात मला अपमानास्पद वागणूक दिली जात असून आपले मत विचारात न घेता परस्पर निर्णय घेतले जात असल्याने आपण पटोलेंसोबत काम करू शकत नाही, अशा शब्दात थोरात यांनी पटोलेंच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीवरून नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आणि त्यानंतर काँग्रेस पक्षात झालेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे बाळासाहेब थोरात हे व्यथित झाले होते. सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेत थोरात यांची बदनामी करण्याचा आणि तांबे कुटुंबीयाला पक्षाबाहेर काढण्याचे षड्यंत्र रचण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी अप्रत्यक्षपणे नाना पटोलेंवर निशाण साधला होता. दरम्यान, थोरात यांनी संगमनेर येथे आयोजित कार्यक्रमात मतदारांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती.

राजीनाम्याच्या वृत्ताला अजित पवारांचा दुजोरा
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी थोरात यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मी राजीनामा दिलेला आहे. तो माझा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे. मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून त्याबद्दलचा पुढचा निर्णय घेईन, असे थोरात यांनी आपल्याला फोनवरून सांगितल्याचे अजित पवार यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले, तर बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा ही दुर्दैवी बाब आहे. आज थोरात यांचा वाढदिवस असून सकाळीच मी त्यांना शुभेच्छा दिल्या. थोरात यांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. काँग्रेस पक्ष वाढीसाठी सर्व काही करणार असल्याचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. तसेच थोरात पक्ष सोडून जाणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

थोरात आमच्याशी बोलत नाहीत : पटोले
दरम्यान, बाळासाहेब थोरात आमच्याशी अजून बोलतच नाहीत. माध्यमांशी बोलत असतील तर माध्यमांनी त्यांना राजीनामा दिला का हे विचारावे, असे पटोले यांनी सांगितले. थोरात यांची तब्येत चांगली नाही. माझा त्यांच्याशी संपर्क नाही. काल पुण्यात उमेदवारांचे अर्ज भरताना सर्वच नेते आले होते. त्यात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होता. त्यावेळी बाळासाहेब थोरातांनीही यावे अशी आमची अपेक्षा होती, असेही पटोले म्हणाले.

बाळासाहेब थोरात १९८५ पासून विधानसभेत
बाळासाहेब थोरात हे विधानसभेतील काँग्रेसचे सर्वात ज्येष्ठ आणि जुने सदस्य आहेत. ते १९८५ पासून सलग आठवेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. १९९९ ला विलासराव देशमुखांच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते, तर २००४ ला विलासराव देशमुखांच्या दुसर्‍या सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले. थोरात यांनी मंत्री म्हणून काम करताना महसूल, कृषी, शालेय शिक्षण आदी महत्वाची खाती हाताळली आहेत.

थोरातांना सन्मानाने पक्ष प्रवेश देऊ – चंद्रशेखर बावनकुळे

आम्ही राजकीय पक्षात काम करत असून पक्ष वाढविणे हे आमचे काम आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात जर भाजपमध्ये येण्यास इच्छुक असतील तर आम्ही त्यांना सन्मानाने पक्षात प्रवेश देऊ, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी येथे केले.

माजी महसूलमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा राजीनामा पक्षाकडे पाठवून दिला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना बावनकुळे म्हणाले, कुणालाही भाजपमध्ये यायचे असेल तर ते येऊ शकतात. आम्ही सर्वांचे स्वागतच करत आहोत. आमचा राजकीय पक्ष आहे. पक्ष वाढविणे हे आमचे काम आहे. बाळासाहेब थोरात असो किंवा अन्य कुणीही असो, जर ते भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असतील, तर त्यांचा मानसन्मान ठेवून आम्ही त्यांना प्रवेश देत असतो.

त्याचवेळी बाळासाहेब थोरात हे काँग्रेस सोडतील की नाही? याबाबतही बावनकुळे यांनी साशंकता व्यक्त केली. ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता मला वाटत नाही. बाळासाहेब थोरात यांच्या रक्तात काँग्रेस आहे. काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी खूप मोठे काम केले आहे, असे ते म्हणाले. बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी काँग्रेसला सावरले होते, पण आज ते का नाराज झाले आहेत याचे काँग्रेसने आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी दिला.

बाळासाहेब थोरात आठ वेळा विधानसभेत निवडून आले आहेत. काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेते म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्यासारखे नेते पक्षात दुखावत असतील तर काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. थोरात यांच्यासारखा उंचीचा नेता जर माझ्यावर नाराज झाला असता तर मी नक्कीच त्यांचा विचार केला असता किंवा त्यावर चिंतन केले असते, असा टोला बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना नाव न घेता लगावला.

First Published on: February 8, 2023 4:23 AM
Exit mobile version