वाद मिटला नाही तरी पालकमंत्री भुजबळच : पाटील

वाद मिटला नाही तरी पालकमंत्री भुजबळच : पाटील

राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यातील वादात प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत प्रतिक्रिया आली आहे. भुजबळ आमचे नेते आहेत, हा वाद मिटेल आणि नाही मिटला तर मुख्यमंत्र्यांसमोर वाद मिटवला जाईल असे सांगत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आहेत आणि तेच राहतील असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

जयंत पाटील सध्या नाशिक दौर्‍यावर आहेत. येवला येथे पक्षाच्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यातील संघर्ष अद्यापही कायम आहे. दोन्ही नेत्यांत खडाजंगी झाली. त्यानंतर नियोजन समितीचा निधी भुजबळांनी विकल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी करत न्यायालयात धाव घेतली. तसेच छगन भुजबळ यांना पालकमंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी आमदार कांदे यांनी केली आहे. तसेच भुजबळांविरोधातील याचिका मागे घेण्यासाठी आपल्याला अंडरवर्ल्डमधून धमकी आल्याचा दावा कांदेंनी केला आहे. त्यामुळे शिवसेना विरूध्द भुजबळ असा सामना रंगला असतांना आज प्रथमच राष्ट्रवादीकडून भुजबळांच्या समर्थनार्थ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आहेत आणि तेच राहतील. भुजबळ आणि शिवसेना आमदार यांच्यातला वाद हा स्थानिक असून अंडरवर्ल्डमधून धमकी देण्यासारखा गंभीर वाद नाही. भुजबळ आमचे नेते आहेत, हा वाद मिटेल आणि नाही मिटला तर मुख्यमंत्र्यांसमोर वाद मिटवला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

First Published on: October 1, 2021 3:54 PM
Exit mobile version