नांदगावी एकाच दिवशी तीन कोरोना पॉझिटिव्ह

नांदगावी एकाच दिवशी तीन कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत असताना काहीशा सुरक्षीत समजल्या जाणार्‍या नांदगाव शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत आज तीनने वाढ झली. आता शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा चार झाला आहे. यापूर्वी एक महिला बाधित आल्याने ती राहत असलेला परिसर कंटेन्मेंट केल्यावर शहरात तीन दिवसांचा लॉकडाऊन सुरु झाला आहे.
दोन दिवसांपूर्वी दोनपैकी एक महिला रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने तिच्या संपर्कातील काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील चौदा निगेटिव्ह आले तर एक पॉझिटिव्ह आला आहे.

यात शहराच्या दुसर्‍या भागातील दोन रुग्णांची भर पडली आहे. त्यात एका डॉक्टरचाही समावेश असून नव्याने सापडलेल्या रुग्णांच्या भागात कंटेनमेंट करण्यासाठी नगर परिषदेच्या कर्मचारी वर्गाची धावपळ सुरु होती. दरम्यान येथील एकाच नमुन्याचे आधी निगेटिव्ह व नंतर पॉझिटिव्ह अहवाल आल्याची माहिती पुढे आल्याने नुकतीच धुळे येथील पृथकरण अहवालात आलेल्या विसंगतीची चर्चा सुरु झाली. निष्कर्ष व वस्तुनिष्ठ अहवाल याबाबतचा संभ्रम दूर करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत नांदगाव शहर व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय आढावा बैठक पार पडली. कोरोनाखेरीज अन्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याबाबद्दल आमदार कांदे यांनी चिंता व्यक्त करताना अधिक सांघिक व परिणामकारक उपाययोजनेची आवश्यकता व्यक्त केली. तहसीलदार उदय कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ससाणे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन बोरसे यांच्यासह विविध खात्यातील अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, आमदार कांदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्हिडीओ कॉन्फरन्सवर संपर्क करून नांदगाव तालुक्यातील कोरोनाविषयक परिस्थितीची माहिती त्यांना दिली. नजिकच्या काळात तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार सांगत असून हा कम्युनिटी स्प्रेडचा (सामुदायिक हस्तांतरण) भाग असल्याने लॉकडाऊनचे भान न बाळगणार्‍या नागरिकांनी आता तरी स्वयंशिस्तीचे पालन करून करोनाला दूर ठेवावे, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. त्यानिमित्ताने शहरात नगर परिषद व पोलीस यांनी अधिक सजग होणे गरजेचे आहे.

First Published on: May 29, 2020 9:05 PM
Exit mobile version