करोनाचे संशयित तिघे निरीक्षणाखाली

करोनाचे संशयित तिघे निरीक्षणाखाली

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुणे आणि मुंबई येथे तिघांना रुग्णालयात निरीक्षणासाठी दाखल केले आहे. आतापर्यंत राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात ३९ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ३६ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

काल संध्याकाळी एका प्रवाशाला सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळल्याने पुणे येथील नायडू रुग्णालयात भरती करण्यात आले तर एकाला मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ३७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह असून उर्वरित दोघा जणांचे प्रयोगशाळा अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होतील. सध्या रुग्णालयात भरती असलेल्या ३ जणांपैकी दोघे पुणे येथील नायडू रुग्णालयात तर १ जण मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २५ हजार ७८२ प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून १६७ प्रवासी आले आहेत. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण १६७ प्रवाशांपैकी ८४ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

First Published on: February 12, 2020 6:47 AM
Exit mobile version