राज्यात तीन लाख रोजगार निर्माण करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

राज्यात तीन लाख रोजगार निर्माण करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई : देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष (75 years of independence) साजरे करत असताना राज्यात ७५ हजार नोकऱ्या देण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. बार्टी, सारथी आणि महाज्योती या माध्यमातून शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. १ लाख २५ हजार रोजगार उपलब्ध होण्यासाठी विविध संस्थांसोबत करार करण्यात आले आहेत. आगामी काळात तीन लाख रोजगार निर्माण करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गुरुवारी येथे दिली.

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर (Ravindra Natya Mandir) येथे गुरुवारी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून कुशल आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिर नक्कीच मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त केला.

युवा पिढीच्या ताकदीवर देश महाशक्तीकडे वाटचाल करतोय, यामुळे संपूर्ण जगात देशाचे नाव अभिमानाने घेतले जाते. देशाची अर्थव्यवस्था ११व्या स्थानावरून पाचव्या क्रमांकावर आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सध्या देशात जी-२०च्या बैठका सुरू आहेत. जी-२०चे अध्यक्षपद भारताकडे असून ही देशासाठी गौरवाची बाब आहे. देशाचे भवितव्य युवा पिढीच्या हातात आहे. त्यामुळेच युवा पिढीला मार्गदर्शन करण्याचे काम केले जात आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

नव्या पिढीने परंपरागत शिक्षणाबरोबर काळाची पावले ओळखून नाविन्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे आहे. युवा संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या करिअरमध्ये मार्गदर्शन करण्याचा तसेच सरकारच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिबिरामुळे पालकांना मिळेल दिशा – फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून या शिबिराला संदेश दिला. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर मार्गदर्शन राज्यातील सर्व मतदारसंघात आयोजित केले होते. या मार्गदर्शन शिबिराचा युवक आणि युवतींना नक्की फायदा होईल. शिबिरात केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची एकत्रित माहिती मिळेल. पालकांनाही या शिबिराच्या माध्यमातून एक दिशा मिळेल. बदलत्या काळानुसार युवा पिढीला कौशल्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे आहे, असे फडणवीस म्हणाले.

First Published on: May 18, 2023 9:15 PM
Exit mobile version