नगरकरांची चिंता वाढली; कोरोनाबाधितांचा आकडा २५ वर

नगरकरांची चिंता वाढली; कोरोनाबाधितांचा आकडा २५ वर

आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयाचा ठेकेदार बदला सामाजिक कार्यकर्ते अजय सावंत यांची मागणी

कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच आता अहमदनगरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास जिल्हा प्रशासनाला मिळालेल्या संशयितांच्या स्त्राव चाचणीत तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तर श्रीरामपुरमध्ये देखील एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे आता अहमदनगरच्या कोरोनाबाधितांची संख्या २५ वर गेली आहे. सध्या या रुग्णावर पुण्यात उपचार सुरु आहेत.

तीन जण कोरोनाबाधित

रविवारी रात्री ५४ तर सोमवारी दुपारी एकाचा असे ५५ अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामुळे नगरकरांना जरासा दिलास मिळत नाही, तोच दुपारी पुण्यात उपचार सुरु असलेल्या श्रीरामपुरच्या गोवर्धनपुरमधील एकाला कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले. त्यापाठोपाठ रात्री दहा वाजता आलेल्या जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या अहवालामध्ये आणखी तिघेजण कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहे. यामध्ये नगरच्या भिंगारमधील आलमगिरच्या दोघांचा तर शहरातील सर्जेपुरा भागातील एकाचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी आलमगिर येथील एकाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने या परिसरातील पंधरा जणांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील दोघे कोरोनाबाधित आढळले. तर सर्जेपुऱ्यातील एकाला बाधा झाल्याने आरोग्य विभाग हादरला आहे. तसेच यांना संपर्कातून बाधा झाल्याचे समोर येत असून त्यामुळे या लोकांच्या संपर्कातील लोंकाची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

श्रीरामपुरमध्ये आढळलेल्या रुग्णाला ४ एप्रिलला त्रास झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी हरेगाव येथील दवाखान्यात आणले होते. तेथून त्याला लाेणीच्या प्रवरा आणि नंतर नगरच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथून त्याला पुण्याच्या ससूनमध्ये उपचारासाठी हलविले होते. त्यालादेखील कोरोनाचीबाधा झाल्याचे समोर आले. विषेश म्हणजे हा रुग्ण दिव्यांग असून तो काही दिवसांपासून आजारी होता. हरेगाव व नाऊर येथील खासगी डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्याचे पुढे आले. त्यामुळे संबधित डॉक्टर व त्यांच्या नातेवाईकांची देखील तपासणी केली जाणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी सांगितले. हा रुग्ण कोणाचाही संपर्कात नव्हता, त्यामुळे कोरोनाची लागण कशी झाली याचा शोध प्रशासन घेत आहे. दरम्यान या परिसरातील सर्वच गावे प्रशासनाने शंभर टक्के लॉकडाऊन केली आहेत.

दरम्यान जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २५ वर पोहोचली असल्याने यापुढे श्वसनाचे विकार, खोकला, न्युमोनियाची लक्षणे आढळलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्याच्या सुचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. त्यामुळे आता या लक्षणांचे रुग्ण थेट नगरच्या जिल्हा रुग्णालयात तपासले जाणार आहेत.


हेही वाचा – Lockdown : देशातला लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची दाट शक्यता!


 

First Published on: April 7, 2020 11:21 AM
Exit mobile version