बाळु धानोरकर, राजीव सातवांची पन्नाशीत; वयाच्या साठीपूर्वीच राज्यातील सहा लोकप्रतिनिधींची एक्झिट

बाळु धानोरकर, राजीव सातवांची पन्नाशीत; वयाच्या साठीपूर्वीच राज्यातील सहा लोकप्रतिनिधींची एक्झिट

2019 लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे आज (30 मे) निधन झाले. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र लोकसभेची यंदाची टर्म महाराष्ट्रातील खासदारांना फारशी चांगली राहिली नाही. कारण एकीकडे एकमेकांचे विरोधक जरी असले तरी, महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या अनेक खासदार आणि आमदारांचे या टर्ममध्ये निधन झाले आहे. परिणामी एका खासदार किंवा आमदाराचे निधन होणे हे सर्व राजकीय पक्षांसाठी धक्कादायक आहे. कारण लाखो मतांनी निवडणून आलेले नेतेमंडळी पक्षाचा सहवास सोडून जातात. तर जाणून घेऊयात लोकसभेच्या या टर्ममध्ये कोणत्या पक्षातील प्रमुख नेत्यांचे निधन झाले…

काँग्रेस खासदार बाळू धानोरकर

काँग्रसचे खासदार बाळू धानोरकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. काही दिवसांपूर्वी बाळू धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर खासदार बाळु धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. अखेर आज बाळू धानोरकर यांनी दिल्लीतील मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. बाळू धानोरकर यांचं वय ४७ इतकं होतं.

सुरेश उर्फ बाळू धानोरकर हे चंद्रपूर मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार होते. बाळू धानोरकर यांचा जन्म ४ मे १९७५ रोजी यवतमाळमध्ये झाला. बाळू धानोरकर यांनी कला आणि कृषी शाखेचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाळू धानोरकर यांनी कपड्यांचे दुकान सुरु केले. वाहन खरेदीसाठी कर्जपुरवठा करणारी कंपनी चालवली. भद्रावतीमध्ये बारही सुरु केला होता.

सुरूवातीला बाळू धानोरकर चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसकडून लोकसभेचे तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या आमदार पदाचाही राजीनामा दिला होता. लोकसभा निवडणुकीत ते चंद्रपूरच्या मतदारसंघातून विजयी झाले होते.

भाजपा खासदार गिरीश बापट

गिरीश बापट (फाईल फोटो)

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बापट यांच्या पश्चात एक मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे. अनेक दिवसांपासून गिरीश बापट आजारी होते. अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

१९८३ पासून सलग ३ वेळा पुणे महापालिकेत नगरसेवक
१९९५ पासून सलग ५ वेळा विधानसभेत
२०१४ ते २०१९ दरम्यान फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
२०१९ मध्ये काँग्रेसच्या मोहन जोशी यांना पराभूत करीत लोकसभेत

कसबा पेठेतील किंगमेकर अशी गिरीश बापट यांची ओळख होती. दीर्घकाळापासून आजारी असतानाही त्यांनी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत सहभाग घेतला होता. नाकात नळी, बोटाला ऑक्सिमीटर लावून भाषण करीत त्यांनी कार्यकर्त्यांचा हुरूप वाढवला होता.

काँग्रेस खासदार राजीव सातव

काँग्रेस खासदार ॲड. राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये मागील 23 दिवस उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. राजीव सातव यांना 21 एप्रिल रोजी करोनाणी लागण झाली होती. त्यायानंतर 23 एप्रिल रोजी सातव यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सन २००२ मध्ये मसोड पंचायत समिती गणातून निवडणुक लढवली. पंचायत समिती सदस्य म्हणून काम पाहिले. त्यानंतर २००७ मध्ये त्यांनी खरवड जिल्हा परिषद गटातून विजयी झाले. जिल्हा परिषदेत त्यांना कृषी सभापतीपद मिळाले. यापदावर काम करतांना त्यांनी शेतीत नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषीरत्न पुरस्कार देण्यास त्यांनी सुरवात केली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मिळाल्यानंतर त्यांनी युवकांची फळी निर्माण केली. सन २००९ मध्ये त्यांनी कळमनुरी विधानसभेेचे आमदार झाले. तसेच त्यांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. हिंगोली लोससभा मतदार संघातून त्यांना सन २०१४ मध्ये मोदी लाटेमध्ये ते विजयी झाले. लोकसभेत मराठवाडा व विदर्भाचा बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख होती. सन २०२० मध्ये त्यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली.

भुषविलेली पदे – मसोड पंचायत समिती पंचायत समिती गणाचे सदस्य, हिंगोली जिल्हा परिषद सदस्य, कळमनुरी विधानसभा आमदार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, अखील भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, हिंगोली लोकसभेचे खासदार, राज्यसभा सदस्य, प्रभारी गुजरात काँग्रेस.

भाजपा आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते, भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि विद्यमान आमदार लक्ष्मण पाडुरंग जगताप (60) यांचे मंगळवारी (3 जानेवारी 2023) सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास दीर्घ आजाराने बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

भाजपा आमदार मुक्ता टिळक

पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार तथा पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मागील वर्षी 22 डिसेंबर 2022 रोजी त्यांचे निधन झाले. त्या ५७ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंजत होत्या. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शिवसेना आमदार रमेश लटके

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील विद्यमान शिवसेना आमदार रमेश लटके यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. रमेस लटके हे 1997 साली प्रथम मुंबई महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. आमदार रमेश लटके कुटुंबियांसह दुबईला गेले होते. तिथेच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं निधन झाले. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. सलग दोन टर्म रमेश लटके हे शिवसेनेचे आमदार राहिले आहेत.

भाजपचे उमेदवार सुनील यादव यांचा पराभव करून शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके हे 2014 मध्ये अंधेरी पूर्वमधून महाराष्ट्र विधानसभेवर पहिल्यांदा निवडून आले. यावेळी काँग्रेसचे उमेदवार सुरेश शेट्टी हे तिसऱ्या स्थानावर होते. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार एम. पटेल यांचा पराभव केला. त्यावेळी लटके हे 16 हजार 965 मतांनी विजयी झाले होते.

1997 मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून लटके हे निवडून गेले. त्यानंतरच्या सन 2002 आणि 2009च्या महापालिका निवडणुकीत विजयी झाले आणि महापालिकेत नगरसेवक म्हणून गेले. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बढती मिळाली आणि ते विधानसभेच आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर पुढच्याच 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले.

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव


कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. बरेच दिवस आजारपणामुळे चंद्रकांत जाधव यांच्यावर हैदराबाद मधील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पोटामध्ये इन्फेक्शन झाल्याने मोठी शस्रक्रिया झाली होती. ही शस्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली, मात्र त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. उपचारदरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दिवंगत आमदार जाधव यांच्या जाण्याने कोल्हापूरचे एक यशस्वी उद्योजक, उत्कृष्ट फुटबॉलपटू, अभ्यासू राजकीय नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. पाच वर्षे त्यांनी भाजपमध्ये काम केले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या चिन्हावर ते निवडूनही आले.

शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांचा त्यांनी पराभव केला. सर्वच पक्षातील नेत्यांशी जाधव यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. 2019 लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसमध्ये प्रवेश करून जाधव हे एका महिन्यात आमदार म्हणून निवडून आले होते.

काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापुरकर

नांदेडमधील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. अंतापूरकर यांच्यावर मुंबई रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

सामान्यांचा आणि तळागाळात जाऊन काम करणारा नेता म्हणून रावसाहेब अंतापूरकर यांची ओळख होती. देगलुर तालुक्यातील अंतापूर येथील रावसाहेब अंतापूरकर यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण देगलुर मानव्य विकास शाळेत झाले. त्यानंतर औरंगाबादमध्ये त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

राजकारणात येण्यापूर्वी ते मुंबई महाराष्ट्र विद्युत मंडळ दक्षता विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. 2009 मध्ये त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. त्यानंतर रावसाहेब अंतापूरकर यांनी देगलुर-बिलोली मतदारसंघातून निवडणूक लढवली. यामध्ये त्यांनी बाजी मारली. तर 2019 मध्येही रावसाहेब अंतापूरकर यांनी सुभाष साबणेंचा पराभव केला होता.

राष्ट्रवादीचे काँग्रेस आमदार भारत भालके

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. १९९२ साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. २००२ पासून त्यांना या कारखान्याच्या अध्यक्षपदावर आजपर्यंत कायम वर्चस्व ठेवले आहे. भारत भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते. मात्र तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले.


हेही वाचा – Balu Dhanorkar Political Journey : कोण आहेत काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर?

First Published on: May 30, 2023 3:51 PM
Exit mobile version