मुख्य सचिवपदासाठी निवडणूक आयोगासमोर तीन नावे, शनिवारी आयोगाकडून होणार शिक्कामोर्तब

मुख्य सचिवपदासाठी निवडणूक आयोगासमोर तीन नावे, शनिवारी आयोगाकडून होणार शिक्कामोर्तब

मुंबई : राज्याचे विद्यमान मुख्य सचिव नितीन करीर येत्या 31 मार्च रोजी निवृत्त होत आहेत. नितीन करीर यांना मुख्य सचिव म्हणून केवळ 3 महिन्यांचा कार्यकाळ मिळाला. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने करीर यांना 6 महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा होती, मात्र राज्य सरकारने करीर यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव न पाठवता सुजाता सौनिक यांच्यासह राजेश कुमार मीना आणि इकबालसिंह चहल या 3 ज्येष्ठ सनदी अधिकार्‍यांची नावे केंद्रीय निवडणूक आयोगाला बुधवारी सुचवली आहेत.

त्यानुसार शनिवारपर्यंत या तिघांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन राज्याला नवे मुख्य सचिव मिळणार आहेत. त्यातही सुजाता सौनिक यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यास या प्रतिष्ठित पदावर विराजमान होणार्‍या त्या राज्यातील पहिल्या महिला ठरतील. याआधी राज्य सरकारने एकट्या सुजाता सौनिक यांच्याच नावाची शिफारस निवडणूक आयोगाकडे केली होती, परंतु आयोगाने हे एकमेव नाव बुधवारी दुपारी फेटाळून लावले. त्यानंतर तीन अधिकार्‍यांची नावे सुचवण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. त्यानुसार 3 नावांची नवी यादी आयोगाला पाठवण्यात आली आहे.

हेही वाचा… Sadanand Date : सदानंद दाते NIA चे महासंचालक; केंद्राचा महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यावर विश्वास

सन 1987च्या बॅचच्या आयएएस आणि गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव असलेल्या सौनिक यांच्यानंतर 1988च्या बॅचचे अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) राजेश कुमार मीना आणि 1989च्या बॅचचे अतिरिक्त मुख्य सचिव (मुख्यमंत्री कार्यालय) इकबालसिंह चहल हे अधिकारी मुख्य सचिवपदाच्या शर्यतीत आहेत. त्यानुसार या तिघांची नावे राज्य सरकारकडून मुख्य सचिवपदाच्या मंजुरीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करीर यांना मुदतवाढ देण्याऐवजी नवा मुख्य सचिव नियुक्त करण्याचे ठरवले. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्याने नितीन करीर यांचा कामकाजाचा गुरुवार हाच अखेरचा दिवस ठरणार आहे.

सुजाता सौनिक यांनी आपले शैक्षणिक तसेच महाविद्यालयीन शिक्षण चंदिगडमध्ये पूर्ण केले. त्यांनी इतिहास विषय घेऊन पंजाब विद्यापीठातून मास्टर्स केले आहे. आपल्या 37 वर्षांहून अधिकच्या कारकिर्दीत सामान्य प्रशासन विभाग तसेच कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम केले आहे. याशिवाय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गृह विभाग, राज्य सरकारच्या सल्लागार तसेच सहसचिव म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. मागील 9 महिन्यांपासून त्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत.

मुख्य सचिवपद भूषवणारे पहिले दाम्पत्य?

तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यकाळात 2009 मध्ये चंद्रा अय्यंगार यांना मुख्य सचिवपदाला मुकावे लागले होते. त्याप्रमाणेच मेधा गाडगीळ, चित्कला झुत्शी, नीला सत्यनारायणन यांना संधी असूनही मुख्य सचिवपद मिळू शकले नव्हते. त्यामुळेच सुजाता सौनिक राज्याच्या मुख्य सचिव झाल्यास इतिहास घडणार आहे. सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक एप्रिल 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत राज्याचे मुख्य सचिव होते.

निवृत्तीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव म्हणून मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुजाता सौनिक यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यास राज्याचे मुख्य सचिवपद भूषविणारे सौनिक हे देशातील पहिले दाम्पत्य असेल. सुजाता सौनिक मुख्य सचिव झाल्यास सुमारे सव्वा वर्षाचा कार्यकाळ सौनिक यांना मिळणार आहे. जून 2025 अखेरीस त्या निवृत्त होतील.

First Published on: March 27, 2024 9:14 PM
Exit mobile version