शिंदे सरकारच्या दुसर्‍या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला? दसर्‍याआधी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता

शिंदे सरकारच्या दुसर्‍या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला? दसर्‍याआधी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता

मुंबई – पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिंदे सरकारमधील बहुतांश आमदार वरवर शांत दिसत असले, तरी आतल्या आत त्यांची धुसफूस सुरूच असल्याचे म्हटले जात आहे. अनेकदा प्रसारमाध्यमांमध्ये ही धुसफूस कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षरित्याही समोर आली आहे. मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होऊन आता 2 महिने उलटून गेले आहेत. दिवाळीनंतर कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा दुसरा टप्प्यातील विस्तार लवकरच व्हावा, अशीच या आमदारांची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदारांच्या मनातली ही खदखद चांगलीच ठाऊक आहे. त्यामुळे येत्या 5 ऑक्टोबरला येणार्‍या दसर्‍याआधी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून रोजी शपथ घेतल्यानंतर महिनाभरानंतर म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात 18 नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. त्यात शिंदे गट आणि भाजपमधील प्रत्येकी 9 आमदारांचा समावेश होता. राज्याच्या मंत्रिमंडाळत ४३ मंत्री असतात. सध्या शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह शिवसेना-भाजपचे मिळून एकूण २० मंत्री झाले आहेत. त्यामुळे उर्वरित २३ मंत्र्यांचाही लवकरच मंत्रिमंडळात समावेश होईल. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये २६ कॅबिनेट आणि १७ राज्यमंत्री असतील. त्यामुळे दुसर्‍या टप्प्यात 7 कॅबिनेट, तर 17 राज्यमंत्र्यांचा समावेश होणार आहे. दुसर्‍या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणाला संधी देण्यात येईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात मुंबईतून कोण?

सध्याच्या मंत्रिमंडळात संजय राठोड आणि सुधीर मुनगंटीवार (विदर्भ); गुलाबराव पाटील, दादा भुसे, गिरीश महाजन आणि विजयकुमार गावित (उत्तर महाराष्ट्र); अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, अतुल सावे आणि तानाजी सावंत (मराठवाडा); चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई, राधाकृष्ण विखे-पाटील व सुरेश खाडे (पश्चिम महाराष्ट्र), उदय सामंत आणि दीपक केसरकर (कोकण), तर रवींद्र चव्हाण (डोंबिवली) यांचा समावेश आहे. मुंबईतून केवळ भाजप आमदार मंगलप्रभात लोढा हेच मंत्रिमंडळात आहेत. येऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीकडे पाहता मुंबईतून कुणाला मंत्रीपदाची लॉटरी लागणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

First Published on: September 19, 2022 12:01 AM
Exit mobile version