शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी एसटी महामंडळाचा गनिमीकावा!

शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी एसटी महामंडळाचा गनिमीकावा!

कोरोनामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झालेला आहे. आतापर्यंत शासनाच्या सवलती रकमेतून एसटी कर्मचार्‍यांचे वेतन देण्यात येत होते. मात्र आता एसटीची तिजोरी पूर्णपणे रिकामी झाल्याने महामंडळ आर्थिक अडचणीत सापडली आहे. राज्य शासनाच्या अर्थ खात्यातून एसटी महामंडळाला निधी मिळत नसल्याने आता एसटी महामंडळाने २०१९ मधील सरळसेवा भरती अंतर्गत रुजू करून घेतलेल्या चालक व वाहकांच्या नेमणुकांना तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दीड हजार कामगार घरी बसणार आहे. मात्र हे फक्त शासनाचे लक्षवेधून घेण्यासाठी एसटी महामंडळाने केलेला गनिमीकावा असल्याची चर्चा आहे.

नेमणुकांना तात्पुरती स्थगिती

कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन झाल्याने सर्वच आघाड्यांवर आर्थिक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या साडेतीन महिन्यांपासून कोरोनामुळे एसटी महामंडळाच्या बसेसचे चाक थांबले आहे. त्यामुळे महामंडळाला कोटयवधी रुपयांचा तोटा झालेला आहे. आतापर्यंत राज्य शासनाच्या सवलतीच्या पैशातून कर्मचार्‍यांना वेतन दिले जात होते. मात्र राज्य शासनाकडून सवलतीचा पैसा येणे बंद झाल्यामुळे आता कामगारांना वेतन देणे एसटी महामंडळाला अवघड झाले आहे. त्यामुळे आर्थिक कारण सांगत एसटी महामंडळाने कर्मचार्‍यांना गेल्या महिन्यापासून ५० टक्के वेतन देण्यास सुरुवात केली आहे. तसेच आर्थिक बचत करण्याकरिता ते कर्मचार्‍यांना सक्तीच्या रजेवर पाठवत आहेत. तसेच एसटी महामंडळाकडे पुरवठादारकांचे ८०० कोटी रुपये देणी थकीत आहे. महामंडळाला राज्य सरकारची मदतीची अत्यंत गरज असताना महाविकास आघाडीचे सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एसटी महामंडळाने २०१९ मधील सरळसेवा भरती अंतर्गत रुजू करून घेतलेल्या चालक व वाहकांच्या नेमणुकांना तात्पुरती स्थगिती देण्याचे परिपत्रक काढल्याची चर्चा महामंडळात रंगली आहे.

 

काय आहे परिपत्रक 

एसटी महामंडळाने २०१९ मधील सरळसेवा भरती अंतर्गत रुजू करून घेतलेल्या चालक व वाहकांच्या नेमणुकांना तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसा आदेश एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी संबंधित विभागांना दिला आहे. या आदेशामुळे जवळपास १ हजार ५०० कामगार घरी बसणार आहे. विशेष म्हणजे चालक तथा वाहक पदांमध्ये रोजंदार गट क्रं१ मध्ये नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांना रोजंदारी नुसार वेतन मिळत होते. मात्र कोरोना काळात काम नसल्यामुळे त्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आले आहे.

First Published on: July 17, 2020 8:40 PM
Exit mobile version