चिंताजनक! राज्यात दिवसभरात २११ पोलिसांना कोरोनाची लागण; ९३ पोलिसांचा मृत्यू

चिंताजनक! राज्यात दिवसभरात २११ पोलिसांना कोरोनाची लागण; ९३ पोलिसांचा मृत्यू

राज्यात दिवसभरात २११ पोलिसांना कोरोनाची लागण

राज्यात आज, शनिवारी २११ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर उपचार घेणाऱ्या १५७ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत ९३ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार १९१ पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असून त्यातील बहुतांश पोलिसांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

१५७ पोलिसांनी केली कोरोनावर मात

गेल्या काही दिवसांत पोलिसांना कोरोनाची लागण होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. आतापर्यंत ८ हजार ४८३ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात ८७७ पोलीस अधिकारी आणि ७ हजार ६०६ पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश होता. त्यापैकी १५७ पोलीस शनिवारी कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये ६६० पोलीस अधिकारी आणि ५ हजार ८११ पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. सध्या राज्यात २१० पोलीस अधिकार्‍यांसह १ हजार ७०९ पोलिसांवर उपचार सुरु आहे. शनिवारी २११ पोलिसांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांना जवळच्या खाजगी आणि शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

राज्यात ९३ तर मुंबईत ४९ पोलिसांचा मृत्यू

कोरोनामुळे आतापर्यंत राज्यात ९३ तर मुंबईत ४९ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. ९३ पोलिसांमध्ये सात पोलीस अधिकारी आणि ८६ पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. दुसरीकडे राज्यात आतापर्यंत ३१७ पोलिसांवर जमावाकडून हल्ला झाला असून त्यात ८८१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कोविडसंदर्भात आतापर्यंत १ लाख ८ हजार ३९६ कॉल मुख्य नियंत्रण कक्षाला प्राप्त झाले आहेत.

लॉकडाऊननंतर राज्यात १ हजार ३४६ अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले असून याच गुन्ह्यांत ३१ हजार ७५२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ९४ हजार ३१ वाहने जप्त केले आहेत. त्यांच्याकडून १६ कोटी ९३ लाख १६ हजार २८७ रुपयांचा दंड वसुल केला आहे.


हेही वाचा – Coronavirus : अनलॉकनंतर नवी मुंबईतील १४६ पोलिसांना कोरोना


 

First Published on: July 26, 2020 8:07 PM
Exit mobile version