“आजचा निकाल हा विरोधकांना चपराक देणारा…”; एकनाथ शिंदेंची टीका

“आजचा निकाल हा विरोधकांना चपराक देणारा…”; एकनाथ शिंदेंची टीका

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आज निर्णय देण्यात आला. सहा याचिकांची एकत्रित सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली.त्यावर आज निर्णय देण्यात आला. त्यात एकनाथ शिंदे – फडणवीस सरकराला मोठा दिलासा दिला आहे. मात्र कोर्टाने राज्यपालांच्या भूमिकेवर कडक ताशेरे ओढले आहेत. तर 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे निर्देश कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत. पण आजच्या निर्णयामुळे विरोधकांना चपराक बसली असून हा निर्णय त्यांना कालबाह्य करणारा आहे, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये फडणवीस यांनी कायद्याच्या बाजू मांडत मत व्यक्त केले.

प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे, या देशात संविधान आहे त्याच्या बाहेर कुणालाही जाता येणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामधून स्पष्ट झालं आहे. आम्ही स्थापन केलेलं सरकार हे कायद्याला धरुन आहे हे स्पष्ट झालं, बेकायदेशीर सरकार म्हणणाऱ्यांना आज सर्वोच्च न्यायालयाने कालबाह्य केलं आहे अशी खोचक टीका त्यांनी केली.

नैतिकता कोणी जपली हे सांगण्याची गरज नाही…
सर्वोच्च न्यायालाने आज अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. कायद्याच्या आधारेच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह हे आम्हाला दिलं आहे. उद्धव ठाकरेंना माहिती होतं की त्यांच्यामागे बहुमत नाही, मग राजीनामा दिल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला, पण नंतर त्याला नैतिकतेचा मुलामा देण्याचा प्रयत्न केला. नैतिकता आम्ही जपली, त्यांनी नाही. भाजप आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली आणि सत्ता त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत स्थापन केली. तेव्हा कोणी नैतिकता जपली हे सांगायची गरज नाही. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना वाचवण्याचं काम हे आम्ही केलं, त्यांनी ते काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलं होतं, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.

एकनाथ शिंदे म्हणाले की, 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष घेतील, कायद्याला धरुनच हा निर्णय घेतला जाईल. आज आमचं सरकार हे सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण बहुमताचं सरकार असल्याचं शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो.

First Published on: May 11, 2023 3:04 PM
Exit mobile version