राज्य सरकारचे वराती मागून घोडे

राज्य सरकारचे वराती मागून घोडे

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांना १३ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपल्यावर राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांसाठी टोलमाफी दिली आहे. त्यामुळे ही टोलमाफी म्हणजे राज्य सरकारचे वराती मागून घोडे असल्याची टीका होत आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोलमधून सवलत मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सांगितले आहे.

यासंदर्भात मंत्री शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कोकण विभागातील पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. टोल सवलतीसाठी कोकणात जाणार्‍या नागरिकांनी स्थानिक पोलीस स्थानकात वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आणि प्रवासाची तारीख नमूद केल्यास त्यांना तात्काळ टोल माफी स्टिकर मिळणार आहे. त्यासाठी नागरिकांनी जवळच्या पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा, असे मंत्री शिंदे यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासाआधी राज्य शासनाच्या नियमांनुसार कोरोनाची चाचणी आणि ई-पास काढणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी समन्वय ठेवून गणेशोत्सवासाठी गावी जाणार्‍या नागरिकांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या आहेत.

First Published on: August 14, 2020 7:14 AM
Exit mobile version