MHADA Konkan Lottery 2021: उद्या म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे ८९८४ सदनिकांसाठी सोडत

MHADA Konkan Lottery 2021: उद्या म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे ८९८४ सदनिकांसाठी सोडत

कोंकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) कल्याण, मिरारोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत उभारलेल्या ८ हजार ९८४ सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत १४ ऑक्टोबर, २०२१ रोजी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे.

या सोडतीसाठी कोंकण मंडळ प्रशासन सज्ज झाले असून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नागरिकांना हक्काच्या घराची शुभ बातमी मिळावी यासाठी ढोल-तुतारीच्या निनादात सोडतीचे नियोजन करण्यात आले आहे. ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग जिल्हातील विविध प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या ८९८४ सदनिकांकरिता अर्जदारांकडून ऐतिहासिक प्रतिसाद लाभला असून सुमारे २ लाख ४६ हजार ६५० अर्जदार या सोडतीत सहभागी होत आहेत.

ठाणे येथील संगणकीय सोडतीच्या कार्यक्रमास उपस्थित राहू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी स्वतःचे ओळखपत्र आणि अर्जाची मूळ पावती सोबत आणावी. अर्जाची मूळ पावती नसल्यास अर्जदाराला सभागृहात प्रवेश दिला जाणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नाट्यगृहात मर्यादित अर्जदारांनाच प्रवेश दिला जाणार आहे. https://mhada.ucast.in या लिंकवर क्लिक करून सदर सोडतीचे घरबसल्या वेबकास्टिंगद्वारे थेट प्रक्षेपण (Live Telecast) बघण्याची सुविधा म्हाडातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोडतीचा निकाल दि. १४ ऑक्टोबर, २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता https://lottery.mhada.gov,in आणि https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध केला जाणार आहे, अशी माहिती कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी दिली.

सदर सोडत कार्यक्रमाला केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, महाराष्ट्र राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा, खासदार राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदर सोडतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत ६ हजार १८० सदनिका सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी शिरढोण (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे ६२४ सदनिका, खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे ५८६ सदनिका, सर्व्हे क्रमांक १६२ खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे २०१६ सदनिका, सर्व्हे क्रमांक १३ भंडारली (ता. जि. ठाणे) येथे १७६९ सदनिका, गोठेघर (जि. ठाणे) येथे ११८५ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी मिरारोड (ठाणे) १५ सदनिका सोडतीत आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी विरार बोळींज येथील १ हजार ७४२ सदनिका, सर्व्हे क्रमांक १३ भंडारली (ता. जि. ठाणे) येथील ८८ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी विरार बोळींज येथे ३६ सदनिका, वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथे २ सदनिका, सर्व्हे क्रमांक २१६ पीटी, २२१ पीटी मिरा रोड (जि. ठाणे) येथे १९६ सदनिका सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उच्च उत्पन्न गटासाठी सर्व्हे क्रमांक ४९१, २३ पार्ट वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथे १ सदनिका सोडतीत आहे.
याशिवाय २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी चंदनसर (ता. वसई, जि. पालघर) येथे ८, वडवली (मोघरपाडा, ठाणे) येथे ७६ सदनिका, मौजे कावेसर आनंद नगर (ता. जि. ठाणे) येथे २३ सदनिका, गाव वालिव (ता. वसई, जि. पालघर) १६ सदनिका, कोपरी (ता वसई, जि. पालघर) येथे २ सदनिका सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी कासारवडवली (ता. जि. ठाणे) येथे १६ सदनिका, मौजे वडवली (ता. जि. ठाणे) येथे ११६ सदनिका, मोघरपाडा (ठाणे पश्चिम) येथे १ सदनिका, मौजे पारसिक नगर (ता. जि. ठाणे) येथे ३५ सदनिका, मौजे डावले (ता. जि. ठाणे) येथे २८ सदनिका, मौजे कावेसर (ता. जि. ठाणे) येथे १४० सदनिका, बालकुंभ- ठाणे येथे २१ सदनिका, भाईंदरपाडा-ठाणे येथे २४ सदनिका, अगासन-ठाणे येथे ४७ सदनिका, टिटवाळा (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे ६२ सदनिका, घणसोली- नवी मुंबई सेक्टर ११ येथे ४० सदनिका, घणसोली- नवी मुंबई सेक्टर ८ येथे ५१ सदनिका, मौजे वाळीव (ता. वसई, जि. पालघर) येथे ६८ सदनिका, कोपरी (ता. वसई, जि. पालघर) येथे २० सदनिका सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.


हेही वाचा – MHADA Recruitment : म्हाडाच्या सरळ सेवा भरती परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ


 

First Published on: October 13, 2021 8:25 PM
Exit mobile version