चिपळूणला सतर्कतेचा इशारा, शहरात पुन्हा मुसळधार

चिपळूणला सतर्कतेचा इशारा, शहरात पुन्हा मुसळधार

Weather Alert : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मुंबईत बुधवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

राज्यात काही दिवस काही भागात तुरळक तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यात दुपारपासून मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे पुन्हा पुरस्थिती निर्माण होतेयं की काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस सुरुच असल्यामुळे पूरबाधित गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहेत. आवश्यक काम असल्यास घराबाहेर पडा अन्यथा पडू नका अशा सूचना देखील नागरिकांना देण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असला तरी वशिष्ठी नदीतील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली नसल्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरुच आहे.

चिपळूणमधील सुरु असेलल्या पावसामुळे तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी सर्व गावांना आणि नगरपालिका, पूरबाधित ग्रामपंचायतींना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. २४ तास सतत पाऊस पडल्यानंतर चिपळूणमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ शकते. नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाकडून नगरपालिकेचे कर्मचारी अनेक भागांच्या गस्तीसाठी नेमण्यात आले आहेत. मुसळधार पावसामुळे शहरात धोकादायक घटना घडू नये यासाठी अधिक काळजी घेतली जात आहे.

जुलै २२, २३ रोजी महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली होती. याचा सर्वाधिक फटका हा चिपळूण, महाड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्राला बसला होता. चिपळूणमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. कित्येक दिवस अनेक घरे पाण्याखाली होते. अनेक नागरिकांचा संसार उध्वस्त झाला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. यामुळे प्रशासनाकडून सध्या अधिक खबरदारी घेण्यात येत आहे.


हेही वाचा : पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे लवकरच पुनर्गठन, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन


 

First Published on: September 6, 2021 10:52 PM
Exit mobile version