पाच पर्यटनस्थळांवर पर्यटकांना दर्जेदार निवास सुविधा मिळणार, एमटीडीसी आणि खासगी विकासकांमध्ये करार

पाच पर्यटनस्थळांवर पर्यटकांना दर्जेदार निवास सुविधा मिळणार, एमटीडीसी आणि खासगी विकासकांमध्ये करार

कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर सेवा आणि आदरातिथ्य क्षेत्राच्या वाढीसाठी मोठा वाव आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील पाच पर्यटनस्थळांवर पर्यटकांना दर्जेदार निवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासगी उद्योजकांबरोबर करार करण्यात आला असल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी दिली.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यातील शासकीय जमिनीचा खासगीकरणाच्या माध्यमातून पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. याअंतर्गत महाबळेश्वर, माथेरान, मिठबाव, हरिहरेश्वर आणि ताडोबा येथे निवास सुविधा उपलब्ध देण्यासाठी खाजगी विकासकांना सवलतीचे करारपत्र गुरूवारी देण्यात आले. यावेळी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, प्रधान सचिव वलसा नायर सिंह, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, एमटीडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक संजय ढेकणे आदी उपस्थित होते.

राज्यात सर्व प्रकारची पर्यटन स्थळे आहेत. येथे पर्यटकांना दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात पाच पर्यटनस्थळांची निवड करण्यात आली आहे. महाबळेश्वर, माथेरान, मिठबाव व हरीहरेश्वर येथील पर्यटन निवांसाकरीता व ताडोबा येथील मोकळ्या जागेकरीता निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून पात्र विकासकांची नियुक्ती पूर्ण झालेली आहे. शासन आणि विकासकांचा हा संयुक्त उपक्रम असणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

आपला देश आणि महाराष्ट्र हे आदरातिथ्यासाठी ओळखले जातात. कोविडनंतर या क्षेत्रात पुन्हा संधी निर्माण झाली असून राज्यातील पयर्टन क्षेत्र जगभर ओळखले जावेत यासाठी शासन विविध पातळ्यांवर प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यात आला असून विविध परवान्यांची संख्या कमी करण्यात आल्याची माहिती ठाकरे यांनी  दिली. शासनाचा हा पथदर्शी प्रकल्प असून यामुळे पर्यटनस्थळांवर पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध होतील. यामुळे पर्यटकांची संख्या वाढून पर्यटनस्थळांच्या विकासाला मोठा हातभार लागेल, असा विश्वास आदिती तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

First Published on: May 19, 2022 8:31 PM
Exit mobile version