समृद्धी महामार्गावरील प्रवास प्रदूषणमुक्त होणार, एमएसआरडीसी ११ लाख झाडे लावणार

समृद्धी महामार्गावरील प्रवास प्रदूषणमुक्त होणार, एमएसआरडीसी ११ लाख झाडे लावणार

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून देशातील सर्वात मोठा महामार्ग असणार आहे. १० जिल्हे २६ तालुके व ३९२ गावांना जोडणाऱ्या या महामार्गाचे काम पर्यावरणाला धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेत वेगाने काम करण्यात येत आहे. या महामार्गावर ११ लाख झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती शिवेसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. महामार्गावर मध्यभागी असलेल्या दुभाजकावर वेगवेगळ्या प्रकारची शोभेची रोपे झाडे लावण्यात येणार आहे. या रोपांमुळे महामार्गावरील प्रवास हा प्रदूषणमुक्त होणार आहे. तसेच महामार्ग काही वर्षांतच हिरवाईने नटलेला पाहायला मिळेल.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी ७०१ किमी लांबीचा व १२० मी. रूंदीचा हा महामार्ग सहापदरी असणार असून गती मर्यादा १५० किमी असल्याने हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई नागपूर अंतर फक्त ८ तासांत कापता येणार आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूस एकूण ११ लाख ३१ हजार झाडे लावण्यात आली आहेत. महामार्गाच्या परिसरात (कॉरिडोरमध्ये) अपघात टाळण्यासाठी तसेच वन्यप्राण्यांचा थेट प्रवेश रोखण्यासाठी, वन्यजीवनाला आकर्षित करणार्‍या १३ फळ झाडांच्या प्रजातींची लागवड करण्यात येणार नाही. या महामार्गाच्या बांधणीच्या कामात वन्य जीव संरक्षण या संस्थेची मदत घेतली जात आहे.

राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक-व्यवसायिक बळकटी देण्यासोबत पर्यटनाला चालना देणाऱ्या या प्रकल्पामुळे शेतीतील उत्पन्न सुधारण्यास मदत होईल तसेच विविध प्रकारच्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यामुळे स्थानिकांना कौशल्य विकासाची संधी मिळेल असा विश्वास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

१३ प्रकारच्या फळझाडांना वगळले

समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूस ११ लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. महामार्गावर अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने १३ झाडे न लावण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवास करताना वाहनचालकांचे लक्ष आकर्षित करणारे काजू, आंबा, जांभूळ, संत्रा, मोसंबी आणि खजूर अशा १३ विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड करण्यात येणार नाही. या कामामध्ये वन्यजीव संरक्षण विभागाची मदत घेण्यात येणार असून या कामासाठी ३२६ कोटी रुपयांचा खर्च येणे अपेक्षित आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूरदरम्यानच्या १२ जिल्ह्यांतून जातो. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या महामार्गाचे नाव स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे नामकरण करण्यात आले. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली होती.

First Published on: July 21, 2021 11:06 PM
Exit mobile version