ट्रेकर्सची जीवाची बाजी

ट्रेकर्सची जीवाची बाजी

30 bodies retrieved from over 500-feet-deep gorge

दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांना सहलीसाठी घेऊन जाणारी बस आंबेनळी घाटात कोसळली. त्यात मृत पावलेल्यांचे मृतदेह अवघ्या २६ तासांत बाहेर काढण्यात यश आले. यामध्ये जीवाची बाजी लावून ८०० फूट खोल दरीत जावून शोधमोहीम राबवणार्‍या महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स या संघटनांमधील ट्रेकर्सचे विशेष योगदान आहे. धोका पत्करून ट्रेकर्सनी रविवारी संध्याकाळपर्यंत ३३ पैकी ३० मृतदेह बाहेर काढले.

ट्रेकर्ससमोर होती आव्हाने

रोप-वेच्या माध्यमातून हे ट्रेकर्स दरीत उतरले आणि शोधलेले मृतदेह रोप-वेच्या माध्यमातून वर पाठवले. या ठिकाणी चिखल, निसरडे दगड असल्यामुळे दरीत उतरणे हे ट्रेकर्ससाठी जीवाची बाजी लावण्यासारखे होते. बुटामुळे पाय स्थिर ठेवणे कठीण जात होते. त्यामुळे अखेर ट्रेकर्सनी बूट काढून उघड्या पायाने दरीत खाली उतरण्याचे आव्हान स्वीकारले. यात चार ट्रेकर्स जखमी झाले. पोलादपूर शहरातील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये मृतांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय करण्यात आली. शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात विलंब होऊ नये, यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये सर्वतोपरी सहकार्य करीत होते.

सह्याद्री ट्रेकर्स

मागील २५ वर्षांपासून सह्याद्री ट्रेकर्सच्या माध्यमातून नवनवीन गिर्यारोहकांना प्रशिक्षण दिले जातेे. यातील प्रत्येक तरुण हा उभ्या दरीला आव्हान देत चढण्याचे सामर्थ्य बाळगतो. त्यांच्यातील याच क्षमतेचा अशा भीषण अपघाताच्या वेळी उपयोग केला जातो. मांढरदेवीची दुर्घटना, सावित्री नदीचा पूल कोसळणे, पन्हाळगडावरील अपघात या सर्व अपघातांवेळी सह्याद्री ट्रेकर्सच्या तरुणांनी जीवाचे रान करून मदतकार्यात सहभाग घेतला.

महाबळेश्वर ट्रेकर्स

मागील दशकभरापासून महाबळेश्वर ट्रेकर्सच्या माध्यमातून गिर्यारोहकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. तीन टप्प्यांत या ट्रेकर्सने पोलादपूर अपघातात मदत कार्य केले. अपघाताच्या दिवशी सकाळी ११ वाजता यांना संपर्क करण्यात आला. त्यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्सचे तरुण क्षणात एकवटले आणि त्यांनी घटनास्थळ गाठले.

शोधमोहिमेच्या ठिकाणी अन्नपूर्णा

घटनास्थळी सकाळपासून मोठ्या प्रमाणात ट्रेकर्स सहभागी झाले होते. त्यांना त्या क्षणी चहा-नाश्ता देण्याचे मोठे काम संगिता पोळ यांनी केले. १९९५ पासून संगिता या ट्रेकिंग करतात. त्यांनी शोधमोहिमेत सहभागी तरुणांच्या पोटापाण्याची सोय करून विशेष योगदान दिले.

First Published on: July 30, 2018 5:35 AM
Exit mobile version