रुग्णवाहिका, बेडअभावी पत्रकाराचा मृत्यू; उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्र्यांचे चौकशीचे आदेश

रुग्णवाहिका, बेडअभावी पत्रकाराचा मृत्यू; उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्र्यांचे चौकशीचे आदेश

tv 9 चे पत्रकार पांडुरंग रायकर

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. या कोरोनाने अनेकांचे बळी घेतले आहेत. तर कोरोना काळात संयतपणे रोपोर्टिंग करणारे ‘टीव्ही ९ मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज पहाटे त्यांनी अखेचा श्वास घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

नेमके काय घडले?

पुण्याचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांना २० ऑगस्टला थंडी वाजून ताप आला होता. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले. त्यानंतर त्यांची २७ ऑगस्टला कोरोनाची चाचणी करण्यात आली. मात्र, त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ ऑगस्टला पांडुरंग रायकर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या गावी गेले. गावी गेल्यावरही त्रास झाल्यामुळे त्यांची कोपरगावमधे अँटीजेन टेस्ट करण्यात आली त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रविवार ३० ऑगस्टला रात्री त्यांना रुग्णवाहिकेमधून उपचारांसाठी पुण्यात आणले. पुण्यातील पत्रकारांनी त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने रायकर यांना जंबो हॉस्पिटलमधे भरती केले. जम्बो हॉस्पिटलमधे त्यांच्यावर आयसीयूमधे उपचार सुरु होते. मात्र, त्यांची परिस्थिती खालावत होती. मात्र, त्यांची ऑक्सिजन पातळी ७८ पर्यंत खाली गेली. जम्बो हॉस्पिटलमधून अन्यत्र नेण्यासाठी कार्डिॲक अँब्युलन्सची गरज होती. रुग्णवाहिका मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मंगळवारी रात्री एक रुग्णवाहिका जम्बो हॉस्पिटलला पोहचली, पण त्यामधील व्हेंटीलेटर खराब झाल्याचे सांगितले गेले. त्यानंतर दुसरी रुग्णवाहिका मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. पण त्यात डॉक्टर उपलब्ध नव्हते. तोपर्यंत रात्रीचे बारा-सव्वाबारा वाजले होते. त्यानंतर पहाटे ५ वाजता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधून रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आणि आयसीयूमधील डॉक्टरांसह ‘आम्ही निघत आहोत’ असा फोन आला. दरम्यान, कार्डिॲक अँब्युलन्स जम्बो हॉस्पिटलला पोहचली पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. डॉक्टरांनी ५.३० वाजताच त्यांचे निधन झाल्याचे सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन झाल्याचे बोले जात आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.


हेही वाचा – Coronavirus Live Update : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोना; होम आयसोलेशनचा सल्ला


First Published on: September 2, 2020 12:11 PM
Exit mobile version