सुशांतसिंह राजपूतसंदर्भातील व्हिडीओ ट्वीट करत नितेश राणे म्हणतात, न्याय होणारच!

सुशांतसिंह राजपूतसंदर्भातील व्हिडीओ ट्वीट करत नितेश राणे म्हणतात, न्याय होणारच!

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची आत्महत्या नसून हत्याच होती, असा खळबळजनक दावा कूपर रुग्णालयातील कर्मचारी रूपकुमार शाह यांनी केला आहे. त्यासंदर्भातील एक व्हिडीओ भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्वीट केला असून त्यावर त्यांनी म्हटले आहे की, न्याय होणारच!

अभिनेता सुशांतसिंह 14 जून 2020 रोजी गळफास घेतल्याच्या स्थितीत वांद्रेस्थित त्याच्या फ्लॅटवर आढळला होता. त्याचा मृतदेह अंधेरीच्या कूपर रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी नेण्यात आला होता. पोस्टमार्टमच्या वेळी उपस्थित असलेल्या रूपकुमार शाह यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हा सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू झाला तेव्हा पोस्टमार्टम करण्यासाठी त्याचे शव कूपर रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी कूपरमध्ये पाच शव पोस्टमार्टमसाठी आणण्यात आले होते. एकाच्या पोस्टमार्टमसाठी गेलो तेव्हा आम्हाला कळले की, ते शव सुशांतसिंग राजपूतचे आहे. त्याच्या शरीरावर अनेक खुणा होत्या, असा दावा रूपकुमार यांनी केला आहे.

आम्ही सुशांतचे पोस्टमार्टम रात्री केले होते. मानेवरही 2-3 ठिकाणी जखमांच्या खुणा होत्या. पोस्टमार्टमचे रेकॉर्डिंग करायला हवे होते, पण उच्च अधिकार्‍यांकडून आम्हाला केवळ बॉडीचे फोटो काढायला सांगण्यात आले. आम्ही तेव्हा जे काही केले, ते त्यांच्या आदेशानुसार केले. आम्ही जेव्हा सुशांतची डेडबॉडी पाहिली तेव्हा आमच्या सीनिअर्सना लगेच सांगितले की, ही आत्महत्या नसून हत्या आहे, असेही रूपकुमार यांनी सांगितले.

तर, सुशांतसिंहची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिचा उंच इमारतीतून पडून 8 जून 2020 रोजी मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ सुशांतसिंह यांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने त्याबाबत संशय व्यक्त करण्यात येत होता. शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले, भाजपा आमदार नितेश राणे व अन्य सदस्यांच्या आग्रही मागणीमुळे दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत फेरचौकशी होणार आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यामध्ये, सुशांतसिंहचा मृतदेह नेणाऱ्यांमध्ये कूपर रुग्णालयातील कर्मचारी रूपकुमार शाह दिसत आहेत. ‘सुशांतसिंहचा मृतदेह घेऊन जाणारे रूपकुमार शाह होते. पोस्टमार्टम दरम्यान ते तिथे होते. शेवटी सत्य समोर येत आहे. न्याय मिळेल!, असे नितेश राणे यांनी या व्हिडीओसोबत ट्वीट केले आहे.

First Published on: January 2, 2023 10:22 AM
Exit mobile version