हरिश्चंद्रगड येथे कल्याणचे २० ट्रेकर्स अडकले; एनडीआरएफचे बचावकार्य सुरू

हरिश्चंद्रगड येथे कल्याणचे २० ट्रेकर्स अडकले;  एनडीआरएफचे बचावकार्य सुरू

हरिश्चंद्रगड येथे कल्याणचे ट्रेकर्स अडकले (प्रातिनिधिक फोटो)

माळशेज घाट येथील हरिश्चंद्रगड येथे कल्याणचे डॉ. हितेश अडवाणी २० जणांसोबत ट्रेकिंगसाठी गेले होते. या ठिकाणाहून पुढे दीड किलोमीटर कोकणकडा येथे १००० फूट खाली सर्व ट्रेकर अडकले आहेत. या ट्रेकर्सना एनडीआरएफच्या मदतीने वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण तहसीलदार आणि पोलीस यांनादेखील यासंदर्भात समन्वय ठेऊन ट्रेकर्सच्या सुटकेसाठी मदत करण्यास सांगितले आहे.

५ महिला, १७ पुरुष

ठाणे जिल्हा माहिती अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अडवाणी यांच्याशी संपर्क झाला असून त्यांच्यासोबत ५ महिला व १७ पुरुष आहेत. कोकणकडापासून खाली ८०० फूट सर्वजण अडकले आहेत. ते अडकलेल्या ठिकाणी अंधार असल्याने त्यांना मार्ग सापडणे कठीण होऊन बसले आहे. या अंधारामुळेच बचाव पथकालाही आपले काम करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या २० ट्रेकर्सना रात्र तिथेच काढावी लागणार आहे. त्यातच तिथे प्रचंड थंडी असल्याने त्यांना आणखी त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सर्व ट्रेकर्स कुठे अडकले आहेत ते नेमके ठिकाण कळावे यासाठी बचाव पथकाला त्यांचे लोकेशन पाठवण्यास सांगितले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी ठाणे ग्रामीण पोलीस तसेच जुन्नर पोलीस यांनादेखील या घटनेविषयी कळविले आहे. तहसीलदार अमित सानप बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. जिल्हा प्रशासन या ट्रेकर्सचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. तसेच नगर जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. ठाण्याहूनही काही ट्रेकर्सची मदत घेतली जात आहे. मुरबाड तहसीलदार आणि त्यांचे कर्मचारीदेखील बचावाच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत.

First Published on: November 25, 2018 11:27 PM
Exit mobile version