जुळ्या बहिणींना १०वीच्या परीक्षेत गुणही जुळेच

जुळ्या बहिणींना १०वीच्या परीक्षेत गुणही जुळेच

(अंकिता-निकीता)

जगात जुळ्या भावंडांच्या अनेक सरस कहाण्या आपण बघत असतो. जुळ्या बहिणींच्या बाबतीतील सुखद घटना पालघर जवळील वसरे या गावात घडली आहे. गावातील जुळ्या बहिणींना दहावीच्या परीक्षेत गुणही जुळेच अर्थात समान मिळाले आहेत.

वसरे भोईर पाडा येथील चिंतामण डगला हे आदिवासी समाजातील शेतमजूर असून घरची परिस्थिती बेताची आहे. त्यांच्या अंकिता आणि निकिता या दोन्ही जुळ्या मुलींना १० वीच्या परीक्षेत एकसारखेच म्हणजे समान गुण मिळाले आहेत. गावाजवळील चहाडे येथील श्रीराम शिक्षण संस्थेच्या स्व.तारामती हरिश्चंद्र पाटील शाळेत शिकणार्‍या निकिता आणि अंकिता या दोन्ही जुळ्या बहिणींना इयत्ता १० वीच्या परीक्षेचा नुकताच लागलेल्या निकालामध्ये बेस्ट ऑफ फाईव्ह या निकषांप्रमाणे ५०० गुणांपैकी एकूण ३६४ गुण म्हणजे ७२.८० टक्के असे समान गुण मिळाले आहेत.

अत्यंत गरीब शेतमजूर कुटुंबातील या दोन्ही जुळ्या बहिणी शिक्षणासोबतच घरकाम आणि शेतीच्या कामांत आपल्या आई-वडिलांना हातभार लावत आहेत. या आधीच्या परीक्षेत एका बहिणीला अधिक गुण मिळाल्यास दुसरी बहीण निराश व्हायची. पण यावेळेस १० वीच्या अंतिम परीक्षेत एकसमान गुण मिळाल्याने दोघीही सध्या भलत्याच खूश आहेत.
त्यांच्या या आगळ्यावेगळ्या यशावर परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दोन्ही जुळ्या बहिणींना बारावीनंतर परिचारिका कोर्स करून वैद्यकीय क्षेत्रात सेवा करायची इच्छा आहे. दोघींनीही आपल्या या यशाचे श्रेय कठीण परिस्थितीतही शिक्षण घेण्यास प्रोत्साहन देणारे वेळोवेळी मदत करणारे आई-वडील, श्रीराम शिक्षण संस्था, चहाडे येथील स्व.तारामती हरिश्चंद्र पाटील शाळेचे अध्यक्ष मधुकर हरिश्चंद्र पाटील, मुख्याधापक किरण पाटील सर आणि शिक्षकांना दिले आहे.

First Published on: August 7, 2020 10:28 PM
Exit mobile version