बिबट्याच्या हल्ल्यात दोन गोऱ्हे ठार

बिबट्याच्या हल्ल्यात दोन गोऱ्हे ठार
देवळा : दहिवड येथील यलदर शिवारात राहणाऱ्या परशराम तुकाराम मोरे यांच्या ग.नं ८१६ मधील शेतातील घराजवळील झाडाला दोरखंडाने बांधलेल्या दोन गोऱ्ह्यावर शनिवारी (ता. १३) पहाटे तीनच्या सुमारास दोन बिबट्यांनी हल्ला केला. यावेळी मोठमोठ्याने गुरं हंबरू लागली, त्या आवाजाने परशराम मोरे व त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर मोरे यांनी बॅटरी घेऊन शोध घेतला असता बॅटरीच्या प्रकाशात दोन बिबटे दोन्ही गोऱ्ह्यांवर पाठीमागून पकडून हल्ला करीत होते.
मोरे यांनी घरातून आरडाओरड तसेच थाळीचा आवाज करीत हुसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन्ही  बिबट्यांनी १५ ते २० मिनिट ठाण मांडत दोन्ही गोऱ्हे फस्त केले.
मोरे यांच्या ओरडण्याच्या आवाजाने आजूबाजूचे शेतकरी जमा झाले त्या जमावाच्या आवाजाने दोनही बिबट्यांनी उत्तर दिशेला असलेल्या डोंगराकडे धूम ठोकली. बिबट्याच्या या हल्ल्यात दोन्ही  गोऱ्ह्याचा मृत्यू  असून संबंधित शेतकऱ्याचे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर उमराणे वनपाल ए.टी. मोरे, वनरक्षक माणिक साळुंखे आदींनी घडनास्थळी भेट देत पंचनामा केला. वन विभागाने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी दहिवडचे सरपंच आदिनाथ ठाकूर व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
First Published on: June 13, 2020 3:30 PM
Exit mobile version