घटकपक्षाकडून शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न, उदय सामंत यांचा आरोप

घटकपक्षाकडून शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न, उदय सामंत यांचा आरोप

शिवसेना नेते उदय सामंत हे दोनच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या गटात सामिल झाले आहेत. शिंदे गटात सामिल होण्याआधी ते शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला हजर होते. ही बैठक संपताच उदय सामंत गुवाहाटीला रवाना झाले. त्यांच्या अशा वागण्यामुळे शिवसैनिक चांगलेच नाराज झाले आहेत. दरम्यान, मी आजही शिवसेनेतच असून शिवसेनेला घटकपक्षाची वाईट नजर लागली आहे. ही नजर बाहेर काढण्यासाठी मी एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ आलो आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. त्यांनी एक व्हिडिओ जारी करून त्यांची भूमिका स्पष्ट केली. (Uday Samant Shared a video talking about Mahavikas aghadi and eknath shinde group)

उदय सामंत म्हणाले की, मी आजही शिवसेनेतच आहे. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नजर लागली आहे. घटकपक्षांची ही नजर आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेला कमकुवत करण्याचे कारस्थान सुरू आहे. घटकपक्षाकडून हे कारस्थान सुरू असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले की, घटकपक्षला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो आहे. राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या निवडणुकीत देखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केले, असा आरोपही उदय सामंत यांनी केला आहे.


शिवसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय मी घेतला आहे, असंही उदय सामंत म्हणाले. त्यामुळे आजही मी शिवसेनेतच असून त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी, कोकणातील जनतेने कोणताही गैरसमज करून घेऊ नये, असं आवाहनही उदय सामंत यांनी केले आहे.

First Published on: June 28, 2022 2:06 PM
Exit mobile version