घरी बसून जे करू शकलो ते त्यांना सूरत आणि गुवाहाटीला जाऊनही नाही जमलं – उद्धव ठाकरे

घरी बसून जे करू शकलो ते त्यांना सूरत आणि गुवाहाटीला जाऊनही नाही जमलं – उद्धव ठाकरे

“मी घरी बसून सरकार चालवून दाखवलं. घरी बसून जे मी करू शकलो ते त्यांना सूरत आणि गुवाहाटीला जाऊनही नाही जमलं. आता महाष्ट्राला दिशा दाखवण्याची वेळ आली आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोला केलाय. तसंच जुन्या पेन्शन योजनेला पाठिंबा असल्याचं सांगत महाशक्ती तुमच्या मागे उभी असेल तर पेन्शन देण्यात काय अडचण आहे? असा कडक सवाल यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला केलाय.

आज नुकतीच महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत मविआच्या नियोजीत सभांबाबतची रणनिती आखण्यात आली असून त्यावर पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. “एकतर भाजपात जा, नाही तर तुरूंगात अशीच सध्याची परिस्थिती झाली असून महाराष्ट्राला दिशा दाखवण्याची वेळ आपल्यावर आली आहे. वापरा आणि फेकून द्या अशी भाजपाची वृत्ती असून त्यांनी शिवसेनेचाही वापर करून घेतला.” असा आरोप यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.

जाणता राजा नाटकामधील अफजलखानाच्या स्वारीचा प्रसंग सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, “त्यावेळी गपगुमान अफजलखानासोबत सामील व्हा, अन्यथा कुटूंबासहीत मारले जाल, अशी फर्मानं त्यावेळी निघाली होती. त्यावेळी काहीजण त्याच्यासोबत गेले. असंच फर्मान कान्होजी नाईक जेधे देशमुखांनाही गेलं होतं. त्यावेळी कान्होजी आपल्या पाच मुलांना घेऊन थेट गडावर महाराजांच्या भेटीला गेले आणि त्यांना खलितं दाखवली. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज त्यांना म्हणाले, जर तुम्ही कुटूंबासहीत मारले जात असाल तर मी काय सांगणार? जा अफजलखानाकडे, तो तुम्हाला राज्यमंत्री पद देईल, महामंडळ देईल, आमदार करेल, विधानसभा, राज्यसभा देईल, तुम्ही आनंदात राहाल. महाराजांचे हे शब्द ऐकून कान्होजी ताडकन उठले आणि बाजूचा तांब्या घेऊन हातावरून पाणी सोडत मुला-बाळांवर पाणी सोडल्याचं सांगितसलं. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत मी स्वराज्याशी द्रोह करणार नाही, असं कान्होजी त्यावेळी म्हणाले.”

या प्रसंगाचा दाखला देत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आजचा काळही तसाच चालला आहे. सामील व्हा नाहीतर आत जा…एकतर भाजपात नाहीतर तुरूंगात…पण छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे अफजलखानाचं काय केलं? हे सांगण्याची गरज नाही. ती ताकद, शक्ती आणि तेज आजही आपल्यात आहे की नाही, याची परिक्षा कुणी मोदी नाही तर छत्रपती शिवाजी महाराज घेत आहेत. म्हणून नेमही देशाला दिशा दाखवणाऱ्या मराष्ट्राला खरी दिशा दाखवण्याची वेळ आली आहे.”, असं देखील उद्दव ठाकरे म्हणाले.

“ही लढाई केवळ शिवसेनेची नाही. लोकशाहीच्या चार स्तंभापैकी ३ स्तंभाची विल्हेवाट लागलेली आहे. पण तरीही माझा सर्वोच्च न्यायालयाकडून आशेचा किरण दिसत आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी जरी असली तरी आपल्या देशात लोकशाहीचं वस्त्रहरण होऊ देणार नाही.”, असं देखील यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधलाय. “जर लोकशाही टिकवायची असेल तर केवळ नेत्यांनीच नाही तर सर्वसामान्य माणसाने देखील पुढे येणं गरजेचं आहे. तुमचे नेते भाजपात जाणार हे आधी तुम्हाला कळलं नव्हतं का, असं मला नेहमी विचारलं जातं. माझे नेते भाजपात जाणार हे मला कळलं होतं. पण त्यांना कशासाठी थांबवायचं. जी विकली गेलेली माणसं आहेत त्यांची सोबत घेऊन लढाई कशी लढू शकतो मी? मला विकाऊ माणसं नको आहेत, ते शिवसैनिक म्हणून घेण्याच्या लायकीचे नाहीत. मला लढाऊ लोक हवेत. जेव्हा भाजपसोबत सरकार होतं तेव्हा भाजप अन्याय करतो हे सांगणारे एकनाथ शिंदेच होते.” असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या वेगवेगळ्या योजनांवरून चांगलाच समाचार घेतला. “पंचामृत कुणी लस्सीसारखं पीत नाही, पंचामृतातले काही शिंतोडे मिळाले तरी मिळवलं. एसटीचा प्रवास फुकट द्यायचा आणि पेट्रोल असं द्यायचं की परवडणार नाही, काच फुटलेल्या एसटीवर गतीमान सरकारची जाहीरात देतात. जेव्हा आपलं सरकार होतं त्यावेळी कोरोनाचं संकट होतं. कोरोना काळात सगळी प्रेत गंगा नदीत टाकून दिली जात होती, पण आपल्या महाराष्ट्रात कोणत्याही मृतदेहाची विटंबना झाली नाही.” असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

First Published on: March 15, 2023 4:53 PM
Exit mobile version