दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, उद्धव ठाकरेंचा निर्धार

दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, उद्धव ठाकरेंचा निर्धार

शिवसेना भवनमध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यासंदर्भात महत्त्वाचं भाष्य केलं आहे. दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. यासाठी तातडीने कामाला लागा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी विभाग प्रमुखांना बैठकीत दिल्या आहेत.

दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार

शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार आहे. यामुळे मनात कोणताही संभ्रम ठेवू नका. महिला आघाडी, युवा सेना आणि शिवसैनिकांनासोबत घ्या. मुंबई महापालिकेमध्ये रिमाइंडर अर्जही देण्यात आला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दोन महिन्यात फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेलाच कसा?

गुजरात महाराष्ट्राचा लहान भाऊ आहे. त्यांच्याकडे प्रकल्प गेला, पण राज्य सरकार त्यावेळी काय करत होतं? दोन महिन्यात फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? यांसारख्या कंपन्या राज्याबाहेर गेल्यामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. सत्ताधाऱ्यांनी याचं आत्मपरीक्षण करावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

फुटलेले सर्व नेते तोतया

शिवसेना भवनमध्ये झालेल्या पदाधिकारी बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर देखील टीका केली आहे. शिवसेना फोडण्याआधी इतिहास जाणून घ्यावा. फुटलेले सर्व नेते तोतया आहेत. जनता त्यांना त्यांचा मार्ग दाखवेल, अशी टीका ठाकरेंनी शिंदे गटावर केली.

शिवसेना आणि दसरा मेळावा असे एक अतूट नाते आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा हा दरवर्षी शिवतीर्थावर होतो. या निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या शिवसेनेच्या सभेला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थिती लावतात. परंतु या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे यंदा दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कुणाचा दसरा मेळावा होणार? यावरून उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र शिवतीर्थावर आमचाच दसरा मेळावा होणार, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितल्यामुळे शिंदे गटाची भूमिका नेमकी काय असणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : महाराष्ट्र गुजरातच्या पुढं नेणं शक्य झालं नाही तर फडणवीस राजीनामा देणार का?, राष्ट्रवादी काँग्रेसचा


 

First Published on: September 17, 2022 4:34 PM
Exit mobile version