उद्धव ठाकरे आज ना उद्या आघाडीतून बाहेर पडतील

उद्धव ठाकरे आज ना उद्या आघाडीतून बाहेर पडतील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीत गुदमरत आहेत. ते आज ना उद्या आघाडीतून स्वत:हून बाहेर पडतील, असे खळबळजनक भाकीत भाजपचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी केले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काकडे यांच्याकडे नवी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यावेळी संजय काकडे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

काकडे पुढे म्हणाले की, मी गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंना ओळखतो. त्यांचा संपूर्ण स्वभाव मला माहीत आहे. ते महाविकास आघाडीत गुदमरत आहेत. त्यांचे प्रत्येक स्टेटमेंट पाहा. त्यातून ते निराश दिसत आहेत. त्यांना जे काही चाललंय ते आवडत नाही. ते आज ना उद्या महाविकास आघाडीतून स्वत:हून बाहेर पडतील. ते अधिक काळ महाविकास आघाडीत राहणार नाहीत. शिवसेना गेली 25 वर्षे युतीत होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून मला वाईट वाटते.

संजय काकडे हे भाजप पुरस्कृत राज्यसभेचे खासदार होते. एप्रिल 2014 मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत ते भाजपच्या मदतीने विजयी झाले होते. यंदा मात्र काकडेंना भाजपकडून राज्यसभेवर स्थान देण्यात आले नाही. आपल्या ‘राजकीय भविष्यवाणी’मुळे ते कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. संजय काकडे यांचे सर्वपक्षीयांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहेत. भाजप प्रवेशापूर्वी अजित पवार यांच्याशी काकडेंचे जवळचे संबंध होते.

काकडेंची विश्वासार्हता काय –अजित पवार
संजय काकडेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अजितदादा म्हणाले, मी पुण्यात आहे. ज्या व्यक्तीने हे स्टेटमेंट केले, त्याची विश्वासार्हता किती आहे हे पुणेकरांना विचारा. अशा वक्तव्यांना महत्त्व देण्याची गरज नाही म्हणत अजित पवारांनी विषय बदलला.

First Published on: May 8, 2021 4:00 AM
Exit mobile version