शिंदे गटातील आमदारांच्या एबी फॉर्मवर उद्धव ठाकरेंची सही; संजय राऊतांचा दावा

शिंदे गटातील आमदारांच्या एबी फॉर्मवर उद्धव ठाकरेंची सही; संजय राऊतांचा दावा

शिंदे गटाचे आमदार धनुष्यबाणावरच निवडून आले आहेत. त्यांच्या एबी फॉर्मवर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची सही आहे, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (Uddhav Thackeray signature on AB form of Shinde group MLAs Sanjay Raut claim)

“शिंदे गटाचे आमदार धनुष्यबाणावरच निवडून आले आहेत. त्यांच्या एबी फॉर्मवर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची सही आहे. ज्यांना आम्ही धनुष्यबाण चिन्ह दिले, त्यातले काही लोकं फुटून बाहेर पडले, याचा अर्थ पक्षात फूट पडली, असे म्हणता येणार नाही. काही आमदार-खासदार निघून गेले असतील, मात्र, पक्ष जागेवर आहे. पक्षातील फुटीचा जो देखावा निर्माण केला जातो, तो आभासी आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जोपर्यंत निर्णय लागत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देण्याची घाई करू नये”, असे संजय राऊत यांनी म्हटले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजे २० जानेवारी रोजी होईल, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे.

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे याबाबत 10 तारखेला झालेल्या सुनावणीत शिंदे गटाकडून बाजू मांडण्यात आली होती. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत निवडणूक आयोगाने दोन्ही गटाचा युक्तीवाद ऐकून घेतला. यावेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. शिवसेनेत फूट पडलेलीच नाही. जी फूट पडल्याचं भासवलं जातं आहे कपोलकल्पित आहे असा दावा कपिल सिब्बल यांनी यावेळी केला. तसेच ही फूट ग्राह्य धरू नये आणि सर्वोच न्यायालयाचा निर्णय येईल पर्यंत कोणतही निर्णय घेऊ नये, अशी मागणी सिब्बल यांनी केली.


हेही वाचा – ठाकरे vs शिंदे : शिवसेना ठाकरेंचीच, ‘त्या’ फुटीला काहीच अर्थ नाही; कपिल सिब्बल यांचा दावा

First Published on: January 17, 2023 7:04 PM
Exit mobile version