पाणी योजना नावाला पाणी नाही नळाला!

पाणी योजना नावाला पाणी नाही नळाला!

कर्जत तालुक्यातून बारमाही वाहणारी उल्हास नदीवर अनेक पाणीयोजना असून, अनेक गावांची तहान ही नदी भागवते. याच ठिकाणाहून दहिवली तर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये वंजारपाडा, शेंडेवाडी गावासाठी पाणी योजना तयार करण्यात आली आहे. मात्र ही पाणी योजना नावापुरती ठरल्याने नळ कोरडे पडले असून, त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांची तारांबळ उडत आहे.

२०१३-१४ साली राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पाणी योजना तयार करण्यात आली आहे. एका वर्षाच्या आतच ही योजना पूर्ण करून कार्यान्वित करण्यात आली. जवळूनच वाहणार्‍या उल्हास नदीमधून साधारण दीड किलोमीटर अंतरावरून पाणी गावात आणले गेले. घरोघरी नळाचे पाणीही आले. मात्र आता ही पाणी योजना नावापुरती उरली आहे. योजना कार्यान्वित झाल्यानंतर पाणी पुरवठा समितीने ती ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत केलीच नाही आणि पाण्याचे कोणाला बिल देखील आले नाही. ४९ लाख इतका निधी खर्च करून बनवलेली या पाणी योजनेची पाइपलाइन प्लास्टिकची आहे. त्यामुळे ती सतत कुठेतरी फुटत असते. विजेचे बिल थकीत आहे, तर मोटार चोरीला जाण्याच्या आणि त्या व्यवस्थित न हाताळल्यामुळे जळण्याच्या घटना या आगोदर घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

परिणामी पाण्यासाठी महिलांची वणवण होत आहे. गावातील एकमेव असलेल्या विहिरीवर महिलांची गर्दी होत आहे. मात्र त्या विहिरीलाही पाणी मर्यादित असल्याने पाण्यासाठी महिलांना विहिरीवर थांबून रात्र जागून काढावी लागत आहे. अनेकदा बैठका घेऊन पाणी पुरवठा समितीला योजनेबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न करून देखील समितीकडून उत्तरेच मिळत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परिणामी गावातील या ‘पाणीबाणी’ मुळे ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्र घेतला आहे. या योजनेबाबत आता थेट जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रारी अर्ज सादर करण्यात आला आहे.

पाणी योजना सुरळीत करण्याचे प्रयत्न आहेत. कमी अधिक विद्युत दाबाने मोटार जळाली होती. ती दुरुस्त करून लवकरात लवकर गावात पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल.
-बाबुराव माळी, सचिव, पाणी पुरवठा समिती

मी वयोवृद्ध महिला आहे. मी या वयात डोक्यावर कितीवेळ हंडे वाहायचे? हे पाणी थोडे दिवस पुरते, अखेर पाणी विकत घेण्याची वेळ येते. आमच्याकडे पैसे देखील नाहीत. मग पाणी विकत देखील कसे घेणार? पाण्याविना मरण पत्करावे का?
-मनुताई धुळे, ग्रामस्थ

पाण्यासाठी आम्हा बायकांना घरातली कामे आणि पाणी दोघांचा मेळ बसवावा लागतो. पण तो न बसल्याने आमची तारांबळ उडते. पाणी योजना गावात येऊनही फायदा शून्य आहे.
-मंदाबाई आगे, ग्रामस्थ

First Published on: January 20, 2020 1:15 AM
Exit mobile version