केंद्रिय मंत्री डॉ. भारती पवार यांना धक्का , दिंडोरीत शिवसेना नंबर वन

केंद्रिय मंत्री डॉ. भारती पवार यांना धक्का , दिंडोरीत शिवसेना नंबर वन

जिल्हयातील नगरपंचायत निवडणुकीत सुरगाणा आणि देवळा नगरपंचायतीवर भाजपचे कमळ फुले तर निफाडमध्ये १७ पैकी ७ जागा मिळवून शिवसेना नंबर वन चा पक्ष ठरला. या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते. दिंडोरीत केंद्रिय मंत्री डॉ. भारती पवार यांना जोरदार धक्का बसला आहे. या ठिकाणी १७ पैकी ६ जागा मिळवून शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे दिंडोरी हा भारती पवारांचा मतदारसंघ आहे.

दिंडोरी नगरपंचायतीची निवडणूक डॉ. भारती पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्या मतदारसंघातही तळ ठोकून होत्या. दिंडोरी हा पवार यांचा मतदारसंघ आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी दिंडोरी भागात अनेक वर्ष काम केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे त्यांनी ही निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. येथे नगरपंचायतीच्या एकूण 17 जागा आहेत. त्यापैकी सहा जागा शिवसेनेने पटकावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जागा पटकावल्या आहेत, तर भाजपला चार आणि काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी येथे शिवसेना आणि राष्ट्रवादीही एकत्र आले, तर नगरपंचायत त्यांच्या ताब्यात राहू शकते. विशेष म्हणजे मोदी लाटेत निवडून येणार्‍या पवार यांना नगरपंचायत निवडणुकीत धक्का बसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

First Published on: January 19, 2022 1:08 PM
Exit mobile version