मनसे नाही तर आरपीआय भाजपची बी टीम; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा अजब दावा

मनसे नाही तर आरपीआय भाजपची बी टीम; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा अजब दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका बदलली असून त्यांनी आता हिंदुत्त्वाचा मुद्दा लावून धरला आहे. राज ठाकरे हे भाजपने लिहून दिलेले कागद वाचत असून मनसे ही भाजपची बी टीम असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, मनसे नाही तर आरपीआय भाजपची बी टीम आहे, असा अजब दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. रामदास आठवले हे गोंदिया जिह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अजब दावा केला आहे.

राज ठाकरे यांच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. त्यांना मंदिरांवर भोंगे लावायचे असतील तर त्यांनी लावावे, मात्र मशिदीवरील भोंगे काढण्याच्या त्यांच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. बाळासाहेब ठाकरे यांचाही विरोध होता. धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये, असं रामदास आठवले म्हणाले.

भाजपने भोंगे काढा अशी भूमिका घेतलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका ही सबका साथ सबका विकास अशी आहे. राज ठाकरे यांना राजकारणात यश मिळत नसल्याने ते अशी उलटसुलट भूमिका घेत आहेत, असं देखील रामदास आठवले म्हणाले.

येत्या ३ तारखेपर्यंत राज्यभरातील मशिदींवरील भोंगे उतरवण्याचे अल्टिमेटम राज ठाकरे यांनी दिलं आहे. त्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या नेते आणि मंत्र्यांनी राज ठाकरेंवर टीका करण्यास सुरूवात केली. अशातच  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही विरोध केला आहे.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या भुमिकेवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. लातूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. देशातील मुस्लिम हे देशातीलच आहेत. हे लोक पुर्वी हिंदू होते त्यापूर्वी ते बौध्द होते. मात्र मोगल देशात आले तेव्हा लोक मुस्लिम झाले, असे म्हटले आहे. तर शंकराचार्य यांनी देशात हिंदू धर्म आणला आणि देशात हिंदू वाढले. त्याचवेळी देशात इंग्रज आले आणि अनेक लोक ख्रिश्चन झाले, असं ते म्हणाले होते.


हेही वाचा : कोरोना महामारीमध्ये शेजारधर्म पाळणारा भारत एक आदर्श देश – शेख हसीना


 

First Published on: April 19, 2022 8:17 PM
Exit mobile version