छगन भुजबळ यांनी आंदोलनासाठी केली होती दुबईच्या व्यापार्‍याची वेशभूषा

छगन भुजबळ यांनी आंदोलनासाठी केली होती दुबईच्या व्यापार्‍याची वेशभूषा

Chagan Bhujbal

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना चांगला कलाकार म्हणून देखील ओळखले जाते. त्यांच्या भाषणात अनेक नेत्यांची मिमिक्री ते करुन दाखवतात. शिवाय गळ्यातील मफलर, कुर्ता, केसांची ठेवण, दाढीची ठेवण अशा राहणीमानामुळे ते कलाकारांइतकेच चर्चेत असतात. तर अशा हा बहुगुणी कलाकार नेत्याने कधी वेशभूषा बदलून आंदोलन केले असेल असे तुम्ही ऐकले आहे का? नसेल तर ही बातमी नक्की वाचा.
छगन भुजबळ यांचा कलाकक्षेत्राशी तसा जवळचा संबंध. १९८५ मध्ये त्यांनी दैवत तर १९९० मध्ये नवरा बायको या मराठी चित्रपटांची निर्मिती केली. त्यांची भाषण करण्याची शैली अनेक जण ‘कॉपी’ करतात. आवाजातील चढ उतार आणि अभिनिवेश हे त्यांचे बलस्थान आहे. त्यांच्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्वाला हिंदू ह्दय सम्राट बालासाहेब ठाकरे यांनीही चांगलेच ओळखले होते. त्यामुळे बाळासाहेब नेहमीच त्यांच्या खांद्यावर महत्वाच्या जबाबदार्‍या टाकत. एकदा तर भुजबळ यांनी वेशांतर करुन आंदोलन केले होते. ४ जून १९८६ चा तो दिवस. कानडी सक्तीच्या विरोधात आणि बेळगांव-कारवार सीमाप्रश्नी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने वेशभूषा करून त्यांनी बेळगावात आंदोलन केले होते. आज त्याला ३५ वर्ष पुर्ण होत आहेत.

Chagan Bhujbal
Chagan Bhujbal

महाराष्ट्रातून येण्याचे मार्ग बंद केल्यानंतर भुजबळ हे वेशभूषा करुन गोवा मार्गे बेळगावात दाखल झाले. दुबईचे व्यापारी इक्बाल शेख यांची वेशभूषा त्यांनी केली होती. बेळगावात दाखल झाल्यावर त्यांनी आंदोलन केले. यानंतर त्यांना अटक करण्यात होती. धारवाडच्या तुरूंगात दोन महिने काढल्यानंतर त्याीं सुटका झाली. यावेळी त्यांच्यासोबत दगडू सकपाळ, बाबा पिंगळे, अरविंद तायडे, हेमंत मंडलिक व असंख्य शिवसैनिक होते. प्रमोद नलावडे यांनी वेशभूषा करण्यात त्यांना मदत केली होती. या घटनेला ३५ वर्ष पूर्ण झाल्याने भुजबळ यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर या आठवणीला उजाळा दिला आहे.

 

First Published on: June 4, 2021 3:30 PM
Exit mobile version