माणगाव पोलिसांवर अज्ञातांचा प्राणघातक हल्ला

माणगाव पोलिसांवर अज्ञातांचा प्राणघातक हल्ला

तपासासाठी गेलेल्या पोलीस अधिकार्‍यासह वाहन चालकाला अज्ञातांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी पहाटे तालुक्यातील इंदापूरनजीक वाढवण येथे घडली. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला असून, पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी चौफेर नाकाबंदी केली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कावळे आणि पोलीस वाहनाचे चालक उद्धव टेकाळे विभागात गस्त घालत असताना पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास इंदापूर येथे २ इसमांनी आपल्या मॅक्सिमो वाहनाचा दुसर्‍या ईको वाहनाशी अपघात झाला, या कारणावरून ईकोमधील अज्ञात व्यक्तींनी पैशांची मागणी केली. त्यांना मारहाण करून त्यांचे वाहन घेऊन वाढवण गावाकडे गेल्याची माहिती दिली. त्यामुळे कावळे तात्काळ वाढवण गावाच्या दिशेने गेले. ज्या ठिकाणी मॅक्सिमो उभी होती त्या घरातील व्यक्तींना उठवले असता ३ पुरुष आणि १ महिला बाहेर आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी वाद सुरू केला. त्यानंतर झालेल्या झटापटीत कावळे यांच्या पायावर जोरदार लाथेचा प्रहार केल्याने ते जागीच कळवळत बसले. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर लोखंडी सळईचा प्रहार केल्याने ते जखमी झाले.

या हल्ल्यात कावळे यांच्या पायाचे हाडही मोडले आहे. यावेळी टेकाळे यांच्यावरही प्राणघातक हल्ला झाला. त्यांच्या डाव्या पायावर जोरदारपणे फावड्याचा प्रहार करण्यात आल्याने मोठी जखम झाली. अशा बिकट परिस्थितीत कावळे यांना चालता येत नसताना ते कसेबसे वाहनाजवळ पोहचले आणि त्यांनी बिनतारी यंत्रणेवरून हल्ल्याची माहिती वरिष्ठांना दिली. तत्पूर्वी, वाढवण येथे जाताना दोघेचजण असल्याने जादा पोलीस कुमक पाठविण्याचा संदेश त्यांनी दिला होता. हल्ल्यानंतर १० ते १५ मिनिटात जादा कुमक घटनास्थळी दाखल झाली.या दरम्यान हल्लेखोर पसार झाले होते. या झटापटीत पडलेला हल्लेखोरांकडील मोबाईल सापडला असून, घरातून २ धारदार तलवारी आणि विदेशी दारूचा साठा आढळून आला आहे.

या प्रकरणी भादंवि कलम ३०७, ३५३, ३२७ ३३२, ३३३, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी शशीकिरण काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रामदास इंगवले आणि उपनिरीक्षक प्रियांका बुरुंगळे करीत आहेत. दरम्यान, हल्लेखोर हे बाहेरगावचे असून, शेतीच्या कामासाठी येतात आणि त्याकरिता घर भाड्याने घेतल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

First Published on: March 19, 2020 2:06 AM
Exit mobile version