वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्राला काय होणार तोटा?

वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्राला काय होणार तोटा?

मुंबई  :  महाराष्ट्रात होणारा वेदांता- फोक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प (Vedanta Foxconn Semiconductor) गुजरातला हलवल्याने सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. या प्रकल्पावरून आता विरोधकांनी भाजपला धारेवर धरले आहे. भाजप सरकार राज्यातील प्रकल्प फायद्यासाठी गुजरातला हलवले जात असल्याचा आरोप शिवसेना आणि विरोधकांकडून केला जात आहे. मात्र हा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्राचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

महाराष्ट्राचं नेमकं काय होणार नुकसान?

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पासाठी कंपनीसोबत तीन वेळा बैठका झाल्या. यानंतर सत्तांतरण होत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. शिंदे फडणवीस सरकारच्या या दोन महिन्याच्या काळात या प्रकल्पासाठी अंतिम बैठक झाली. असे असतानाही वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात या राज्यात सुरु होणार आहे. ज्याचा फटका महाराष्ट्राला सहन करावा लागणार आहे.

वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी 1.54 लाख कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाणार होती. हा प्रकल्प पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे सुरु होणार होता. ज्यामाध्यमातून 80 हजार ते एक लाख रोजगार निर्माण झाला असता. यातून 30 टक्के रोजगार हा थेट आणि 70 टक्के अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती झाली असती.

फोक्सकॉन कंपनी ही मुळची तैवानची कंपनी असून यासोबत वेदांता या कंपनीने भागीदारी केली आहे, महाराष्ट्रात तीन टप्प्प्यांमध्ये हा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव होता. ज्यात जवळपास पावणे दोन लाख कोटींची गुंतवणूत केली जाणार होती. या माध्यमातून डिस्प्ले फॅब्रिकेशन, सेमीकंडक्टर्स, सेमीकंडक्टर असेंबली आणि टेस्टिंग फॅसिलिटीसाठी अनुक्रमे 1 लाख कोटी, 63 हजार कोटी, 3800 कोटी खर्च केले जाणार होते. यातून महाराष्ट्राला मोठा प्रमाणात कर मिळाला असता.

डिझाइन्स आणि नाविन्यपूर्णतेसाठी जागतिक स्तरावर महाराष्ट्राची ओळख आहे. या प्रकल्पामुळे पुण्याच्या तळेगावत विशेषतः महिलांना प्रशिक्षित करून त्यांना रोजगार निर्माण झाला असता. तसेच महाराष्ट्राची ओळख दुसरी सिलिकॉन व्हॅली म्हणून झाली असती. या प्रकल्पामुळे 150 हून अधिक कंपन्या गुंतवणुकीचा भाग झाल्या असल्या. तसेच स्थानिक इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला आणि इतर उद्योगांनाही चालना मिळाली असती.

प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये सेमीकंडक्टर अर्थात चीपची गरज असते. या चीप निर्मितीमध्ये तैवान आघाडीवर देश आहे. यात भारताचा विचार केल्यास भारतात 2020 पर्यंत 15 अब्ज डॉलर इतकी सेमीकंडरक्टरची बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ 2026 पर्यंत 63 अब्ज डॉलर इतकी होण्याचा अंदाज आहे. मात्र भारतात चीप निर्मितीचा एकही प्रकल्प नाही. त्यामुळे भारतात या निर्मितीसाठी प्रयत्न आहे. सध्या भारताला तैवान, चीनसारख्या मोजक्याच देशांवर सेमीकंडक्टरससाठी अवलंबून रहावे लागते. यात आगामी डिजीटल तंत्रज्ञानातील वाढती प्रगती लक्षात घेता या उत्पादनाची मागणीही वाढणार आहे. यात चीन तैवान तणाव, कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतात सेमीकंडक्टर आयात करण्यात अनेक अडचणी येत आहे. त्यामुळे भारताने सेमीकंडक्टर प्रकल्पाबाबत आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.

भारतात सेमीकंडक्टर तयार करणारा प्रकल्प वेदांता समूह-फॉक्सवेगन अहमदाबादजवळ सुरू करणार आहे. ज्यासाठी 20 अब्ज डॉलरचा खर्च होणार आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांनी हा प्रकल्प आपल्याकडे सुरु करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र अचानक हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.


प्रकल्प महाराष्ट्रातून निसटला कसा?, फॉक्सकॉन- वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज ठाकरेंचा संतप्त सवाल

First Published on: September 14, 2022 9:13 AM
Exit mobile version