महागलेल्या शाकाहाराला रानभाज्यांचा दिलासा

महागलेल्या शाकाहाराला रानभाज्यांचा दिलासा

जूनमध्ये लांबलेल्या पावसाने बाजारात आलेल्या भाज्या महागल्यामुळे शाकाहार आपोआपच महागला. शाकाहार चविष्ट बनविण्यार्‍या भाज्या महागल्यामुळे शाकाहाराची चवच गायब झाली होती. मात्र आता रानभाज्या बाजारात दाखल होऊ लागल्यामुळे शाकाहारींना दिलासा मिळाला आहे. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागालगतच्या डोंगर भागातून गुणकारी रानभाज्या बाजारात दाखल होऊ लागल्या आहेत.

पावसाळा सुरू झाला की आठवडाभरात या रानभाज्या बाजारात दाखल होतात. वर्षातून फक्त याच दोन महिने मिळणार्‍या रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी गरीब, मध्यमवर्गीय व उच्चभ्रू घरातीलसुद्धा लोकांचा या भाज्या खरेदी करण्याकडे कल असतो. शाकाहाराबरोबरच मांसाहारी लोकही या भाज्या आवर्जून खरेदी करताना दिसतात. हातावर पोट असणार्‍यांसाठी व वर्षभर गावठी भाजी विकणार्‍यांसाठी हा काळ पर्वणी ठरतो. निसर्ग स्वत:च ही भाजी पिकवून देत असल्यामुळे कोणताही खर्च न करता केवळ कष्टाने भाजी मिळवून ती बाजारात आणावी लागते. या रानभाज्या औषधी व गुणकारी असल्याने त्या खरेदीसाठी खवय्यांची मोठी झुंबड उडत असते.

पाऊस सुरू झाल्याने माळरानावर व जंगलात विविध औषधी भाज्या उगवतात. शेवळे, टाकळा, कोळा, भारंगा, कंटोळी, कुडी, आकूर, कुलू आदी औषधी व गुणकारी भाज्या आदिवासी महिलांबरोबरच इतर समाजातील कुटुंबांना रोजगार मिळवून देतात. या भाज्यांना बाजारात मागणी असून, या विक्रीतून दिवसाला ३०० ते ४०० रुपये मिळत असल्याचे वाडगाव येथील मनीषा भगत यांनी सांगितले. रानात उगविणार्‍या या भाज्या विविध विकारावर गुणकारी असल्याचे मानले जाते. वयोवृद्ध माणसे या भाज्या वर्षांतून एकदा तरी खाव्यात यासाठी आग्रही असतात.

या भाज्या वाटा किंवा जुडीच्या स्वरुपात विक्रीला येतात. साधारणपणे वाटा १० ते २० रुपये, तर जुडीची किंमत त्यांच्या आकारावर अवलंबून असते. यातील पालेभाज्या २० रुपयांपासून खरेदीसाठी बाजारात उपलब्ध असतात. वर्षभर मेथी, आळू, पालक, शेपू, लाल माठ यांसारख्या नेहमीच्या पालेभाज्या खाणारे आपल्यापैकी अनेक जण पावसाळ्यात मात्र रानभाज्यांची चव चाखतात. रायगड जिल्ह्यात पनवेल, कर्जत, अलिबाग, उरण, रोहे, सुधागड, माणगाव आदी तालुक्यांत या भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर असते. मुंबईतील काही ठराविक बाजारांमध्ये तेथूनच या भाज्या विक्रीसाठी येतात. कोकणातील गावागावांत बुहुतेकांना या रानभाज्यांची माहिती असल्याने पावसाळी हंगामात रोज त्यांच्या जेवणात एखाद लज्जतदार रानभाजी असतेच.

इंटरनेटमुळे रानभाज्या आता जास्तीत जास्त लोकांना ठाऊक होऊ लागल्या आहेत. त्यांच्या पाककृती टीव्ही चॅनेल्सवर दाखवल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे हल्ली लोकांना याची माहिती होऊ लागली असल्याचे विविध प्रकारच्या रानभाज्यांची माहिती असलेल्या अलिबागचे गंगाराम घरत यांनी सांगितले. या भाज्या खतांवर तयार होत नाहीत. मात्र व्यवस्थित माहिती घेऊनच रानभाज्या खरेदी कराव्यात. रानभाज्या आरोग्यासाठी लाभदायक असल्याने त्याची माहिती शास्त्रोक्त पद्धतीने समोर आली पाहिजे.

रानकेळी, चायवळ, शिडाचे बोख, ससेकान, नारेली, करटुली, कुड्याची फुले, कोरड, चिवळी, चिंचुरडा, शेवाळी, मोखा, रानकेळी, कुरडू, फोडशी, कोरलं, कवळा, आंबट वेल, दिंडा, वाघेटी, टेरी, आळू, भोपरं, भुईछत्री, अळंबी, भोपळा पाने, इकरा, अंबाडा फळे, माठ देठ, कवळा अशा अन्य पालेभाज्या व फळ वर्गातील भाज्या आहेत.

First Published on: July 9, 2019 3:05 AM
Exit mobile version