गाडीचा विमा काढा, नाहीतर गाडी जप्त!

गाडीचा विमा काढा, नाहीतर गाडी जप्त!

वाहनाचा विमा न काढल्यास वाहन होणार जप्त

वाहनाचा विमा काढण्याची सक्ती असताना देखील बरेच वाहन चालक विमा काढत नाही. मात्र आता अशा वाहन चालकांना याचा मोठा फटका बसणार आहे. वाहनाचा विमा न काढल्यास वाहन जप्त करण्यात येणार असल्याचा इशारा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिला आहे. तसेच दारु पिऊन गाडी चालवताना पकडल्यावर सहा महिन्यांसाठी परवाना देखील रद्द होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. परिवहन आणि वाहतूक पोलिसांची आज बैठक झाली असून त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

थर्ड पार्टी विमा अनिर्वाय

देशभरात थर्ड पार्टी विमा अनिर्वाय करण्यात आला असला तरी देखील ५० टक्के वाहने अद्याप या विम्याने सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे थर्ड पार्टी विम्यासंबंधी नियमाची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही केंद्रीय वाहतूक मंत्रालयानं राज्य सरकारला दिले आहेत.

थर्ड पार्टी विम्याची रक्कम माफ करावी

ट्रकमालकांच्या संघटनेने सरकारकडे थर्ड पार्टी विम्याची रक्कम पूर्णपणे माफ करावी अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत रास्त निर्णय घेतला जाईल, असे सरकारने या संघटनेला आश्वासन दिले होते. भारतात दुचाकी विक्रीची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. तसेच डिजिटल मंचावरुनही आता विमा उपलब्ध होतो. मात्र चालू वर्षात ६० टक्के भारतीयांना मुदत संपलेल्या पॉलिसी पुनरुज्जीवित करण्यासाठी ऑनलाइन दुचाकी विमा पॉलिसीचा पर्याय निवडल्याचंही एका सर्वेक्षणातून समोर आले होते. भारतात ऑनलाइन दुचाकी विमा पॉलिसी घेणाऱ्या १० लाखांहून अधिक ग्राहकांनी केलेल्या व्यवहारांच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आले होते त्यामध्ये ही आकडेवारी समोर आली आहे.


वाचा – दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवास – दिवाकर रावते

वाचा – महाराष्ट्र महामंडळ कशाला? दिवाकर रावतेंनी व्यक्त केली नाराजी!


 

First Published on: December 31, 2018 6:25 PM
Exit mobile version