विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक; कुणाला उमेदवारी?कुणाचा पत्ता कट?

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक; कुणाला उमेदवारी?कुणाचा पत्ता कट?

विधानभवन

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. त्यामुळे कुणाला उमेदवारी मिळणार? कुणाचा पत्ता कट होणार? याकडे आता राजकीय वर्तुळामध्ये धकधक वाढली आहे. शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील, शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, जयदेव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर,काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे सीट राहणार की जाणार अशा अवस्थेत सध्या विद्यमान आमदार असून नवा चेहरा कोण असणार याची देखील उत्सुकता लागून राहिली आहे. १६ जुलै रोजी मतदान झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी होणार आहे.

घोडेबाजाराची शक्यता

विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये घोडेबाजाराची शक्यता देखील वर्तवली जात आहे. शिवसेनेचा १ उमेदवार वाढला असून त्यानंतर देखील शिवसेनेकडे जास्तीची १३ मते आहेत. त्यामुळे शिवसेनेची जादा १३ मते कुणाच्या पदरात जाणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. शेकाप अर्थात शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हे देखील विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी उत्सुक असून पाटील यांना काँग्रेसच्या कोट्यातून जागा देण्याची खेळी शरद पवार करताना दिसत आहेत. तसे झाल्यास काँग्रेसची एक जागा कमी होईल. तर शिवसेनेकडून अनिल परब यांना उमेदवारी निश्चित असून दुसऱ्या जागेसाठी प्रवक्त्या मनिषा कायंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तर काँग्रेसकडून शरद रणपिसे आणि वजाहत मिर्झा यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे आणि संजय दत्त यांचा पत्ता कट करण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून तिसरा उमेदवार कोण याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान शेकापच्या जयंत पाटील यांना कुणाच्या कोट्यातून उमेदवारी मिळणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

भाजपने जाहीर केली उमेदवारांची नावे

विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपने आपल्या ५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपच्या कोट्यातून रासप अर्थात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, विजय गिरकर, राम रातोळीकर, रमेश पाटील आणि निलय नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होते का? याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.

First Published on: July 4, 2018 10:29 AM
Exit mobile version