भारतीय रंगभूमीचे अतोनात नुकसान; मुख्यमंत्र्यांसह ‘या’ नेत्यांनी गोखलेंना वाहिली श्रद्धांजली

भारतीय रंगभूमीचे अतोनात नुकसान; मुख्यमंत्र्यांसह ‘या’ नेत्यांनी गोखलेंना वाहिली श्रद्धांजली

vikram gokhale passed away in pune cm eknath shinde devendra fadanvis uddhav thackeray paid tribute

भारतीय सिनेविश्वातील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. अभिनेत्याने 26 नोव्हेंबर रोजी दुपारी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या निधनावर आता मराठी, हिंदी सिनेसृष्टीसह राजकीय वर्तुळातूनही श्रद्धांजली वाहिली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

चित्रपटक्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान-  एकनाथ शिंदे

आपल्या चतुरस्त्र अभिनयाने मराठी व हिंदी रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीत व रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अतीव दुःख झाले. त्यांचा जाण्याने भारतीय रंगभूमी व चित्रपटक्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ आपल्यातून हरपले- देवेंद्र फडणवीस

अभिनयाच्या क्षेत्रातील त्यांचा परिचय तर मोठा होताच, पण सैन्यदलात काम करताना अपंगत्त्व आलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत किंवा निराधार बालकांचे शिक्षण यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ आपल्यातून हरपले असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

त्यांचे जाणे चटका लावणारे – उद्धव ठाकरे

विक्रम गोखले गेले. विश्वास बसत नाही. काल परवपर्यंत ते तसे संपर्कात होते. अनेक विषयांवर त्यांची मते ठाम असतं.एक कसदार राजबिंडा अभिनेते म्हणून चित्रपट रंगभूमी त्यांनी गाजवली. स्पष्ट संवादफेक हे त्यांचे वैशिष्ट्य. हिंदी सिनेसृष्टीतील तो लोकप्रिय मराठी चेहरा होता. त्यांचे जाणे चटका लावणारे आहे. मृत्यूवर मात करुन ते परत येतील असे वाटत होते. पण दुर्दैव. या महान अभिनेत्याला शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी आदरांजली अर्पण केली आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीची अपरिमित हानी झाली- श्रीकांत शिंदे 

मराठी रंगभूमी सोबतच मराठी व हिंदी मालिका आणि चित्रपट सृष्टी अशा तिन्ही माध्यमातून आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांवर स्वतःची वेगळी छाप पाडणारे ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांच्या दुःखद निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीची अपरिमित हानी झाली आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!

अभिनयाच्या विद्यापीठाला मुकलो – चंद्रकांत पाटील 

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने आपण अभिनयाच्या विद्यापीठाला मुकलो आहोत. नाटक, मालिका, मराठी, हिंदी चित्रपट अशा सर्वच माध्यमांत अभिनयाचा दबदबा निर्माण करणाऱ्या विक्रमजींचे संवाद आणि विराम (pauses) अभ्यासनीय होते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. ॐ शांति| अशा शब्दात शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री चंद्रकात पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

एका ताकदीच्या अभिनेत्याला आपण मुकलो  – दिलीप वळसे पाटील 


संयत संवादफेक आणि पॉझमधूनही भावनांचे वहन करण्याची विलक्षण क्षमता असलेल्या एका ताकदीच्या अभिनेत्याला आपण मुकलो. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. 

एक उत्तुंग व्यक्तिमत्व आज हरपले – धीरज देशमुख

दमदार अभिनय, भारदस्त आवाज या बळावर चित्रपट, नाटक, मालिका या माध्यमात स्वतःचा ठसा उमटवलेले प्रख्यात अभिनेते #विक्रम_गोखले यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आज हरपले आहे. कलेबरोबरच सामाजिक बांधिलकीचा वारसा त्यांनी आयुष्यभर निष्ठेने जपला. असं म्हणत काँग्रेस नेते धीरज देशमुख यांनी विक्रम गोखलेंना आदरांजली वाहिली.


शिंदेसरकारवर कामाख्या देवीचा कोप सरकार लवकरच गडगडणार, राष्ट्रवादी नेत्याचा दावा

First Published on: November 26, 2022 3:49 PM
Exit mobile version