अतिवृष्टीमुळे नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील गावांचा संपर्क तुटला; तर 8 जिल्ह्यांना रेड अलर्ट

अतिवृष्टीमुळे नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील गावांचा संपर्क तुटला; तर 8 जिल्ह्यांना रेड अलर्ट

मागील अनेक दिवसांपासून पावसाने चांगलाचं जोर धरला आहे. मुंबईसह राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. राज्यातील गडचिरोली येथे पूरस्थिती निर्माण झाली असून तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. पुढील तीन दिवस या जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिकमधील काही गावांचा संपर्क तुटला
सध्या नाशिकमध्ये देखील पावसाचा जोर कायम आहे. मागील तीन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव-मुरंबी रस्त्यावरील घोडनदीच्या पुलाचा काही भाग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे येथील 20 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटलेला आहे. तसेच मागील तीन दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे नाशिकमधील गंगापूर धरण 55 % भरलेलं आहे.

नंदुरमधील अनेक गावांचा संपर्क तुटला
नंदुरबार जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. गेले 36 तास पाऊस सतत बरसत आहे. अतिवृष्टीमुळे येथील नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील अनेक भागात पूर स्थिती निर्माण झाली आहे. येथील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नवापूर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे.

मुंबईसह कोकणातही ऑरेंज अलर्ट
सध्या पालघर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. तसेच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने या भागात ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 4 ते 5 दिवस पाऊस असाच चालू राहिल, तसेच मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील 8 जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने राज्यातील 8 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलेला आहे. त्यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा सहभाग आहे. तसेच मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद,जालना, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे.


हेही वाचा :गडचिरोली जिल्ह्यात ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

First Published on: July 11, 2022 11:43 AM
Exit mobile version