भारत बंदला राज्यात हिंसक वळण

भारत बंदला राज्यात हिंसक वळण

भारत बंद

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमविरोधात बहुजन क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. या बंदला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. पालघर, औरंगाबाद, परभणी, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये आंदोलकांनी एसटी बसेस्वर दगडफेक करत त्यांच्या काचा फोडल्या. तर मुंबईत आंदोलकांनी कांजुरमार्ग रेल्वे स्थानकाजवळ रेले रोको केल्यामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या ऐन गर्दीच्या वेळेत १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या, तर सुमारे २० गाड्या रद्द करण्यात आल्या.

बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. बंद यशस्वी व्हावा यासाठी मुंबईमध्ये काही आंदोलक हे रेल रोको करण्यासाठी ट्रॅकवर उतरले होते. कांजूरमार्ग स्थानकाजवळ बहुजन क्रांती मोर्चाने रेल रोको केला. या रेल रोकोचा फटका मध्य रेल्वेला बसला असून वाहतुकीवर परिणाम झाला.

मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने होत होती. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. आंदोलन करणार्‍या आंदोलकांना पोलिसांनी ट्रॅकवरून हटवले असून सुमारे ४० आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

औरंगाबादेत बंद दरम्यान एस टी बस अडविणार्‍या जमावाने पोलिसांना मारहाण केली. तसेच पत्रकारांचा कॅमेराही फोडला, तर सोनाळा येथे दोन गटात हाणामारी होऊन त्यात एक जण जखमी झाला. यवतमाळमध्ये बंद दरम्यान यवतमाळातील मारवाडी चौकात आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली. अकोल्यात काही आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला. दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पालघरमध्ये जबरदस्तीने दुकाने बंद करून रास्ता रोको करणार्‍या मोर्चेकर्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. धुळ्यातील शिरपूरमध्ये बसवर दगडफेक करण्यात आली. त्यात एक जण किरकोळ जखमी झाला. जळगावमध्ये शामा फायर व्यापारी संकुलात फोटो स्टुडिओ फोडण्याचा प्रयत्न झाला.

महिलेने फेकली मिरची पूड
यवतमाळच्या बाजारपेठेत काही आंदोलक दुकाने बंद करण्यासाठी आले होते. यावेळी आंदोलकांची एका दुकानदार महिलेशी वादावादी झाली आणि शाब्दिक चकमक वाढतच गेली. त्याचवेळी काही आंदोलकांनी जबरदस्तीने दुकान बंद करण्याचा प्रयत्न केल्याने संतापलेल्या या महिलेने या आंदोलकांच्या तोंडावर मिरची पावडरच फेकून मारली. त्यामुळे आंदोलकांमध्ये एकच धावपळ उडाली. त्यामुळे हे भांडण पाहण्यासाठी जमलेल्या जमावालाही अचानक झालेल्या या प्रकारामुळे आश्चर्याचा धक्का बसला.

First Published on: January 30, 2020 6:49 AM
Exit mobile version