‘खदखदखद लाव्हा रस’, मास्तर नितेश कराळे यांच्या अतरंगी शिकवणुकीचे व्हिडिओ व्हायरल

‘खदखदखद लाव्हा रस’, मास्तर नितेश कराळे यांच्या अतरंगी शिकवणुकीचे व्हिडिओ व्हायरल

फेसबुकवर व्हायरल झालेले मास्तर नितेश कारळे

फेबुकवर सध्या एका शिक्षकाचा ऑनलाईन क्लास प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील सर आपल्या अनोख्या शैलीत मनोरंजन करत विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. मात्र हे शिक्षक असे का शिकवत आहेत. त्यामागे त्यांचा दृष्टीकोन बऱ्याच जणांना समजलेला नाही. त्यामुळे अनेकांनी या शैलीची खिल्ली देखील उडवली. टीव्ही ९ या वृत्तवाहिनीने या शिक्षकाला शोधून त्यांची प्रतिक्रिया समोर आणली आहे. वऱ्हाडी भाषेत शिकवणाऱ्या या शिक्षकाचे नाव आहे नितेश कारळे. ते वर्धा जिल्ह्यातील असून २०१३ पासून वऱ्हाडी भाषेत स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन करत आहेत. त्यांना स्वतःला मास्तर म्हणवून घ्यायला आवडतं.

वर्ध्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळावे. पुण्यातील विद्यार्थ्यांना त्यांनी स्पर्धा द्यावी. या भूमिकेतून कराळे मास्तरांनी २०१३ कोचिंगला सुरुवात केली होती. मात्र लॉकडाऊनमध्ये त्यांना क्लासेस घेता येत नव्हते. झुम आणि गुगल व्हिडिओ कॉलवर विद्यार्थ्यांची मर्यादा येत होती. त्यामुळे एकाच व्हिडिओत सर्वांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करुन करायला सुरुवात केली. यामध्ये भुगोलाच्या धड्यातील ज्वालामुखीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडिओमागची कथा सांगताना कारळे मास्तर म्हणाले की, काही विद्यार्थ्यांनी या व्हिडिओचे मिम्स बनवले आणि व्हायरल केले. या मिम्सना तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर आता नितेश कारळे चांगलेच प्रसिद्ध झाले आहेत.

 

कारळे यांचे शिक्षण बीएससी बीएड पर्यंत झालेले आहे. सुरुवातीला त्यांनी पुण्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी क्लासेस केले. मात्र त्यात त्यांना यश लाभले नाही. त्यानंतर २०१३ पासून स्पर्धा परिक्षेचा पुणेरी पॅटर्न या घोषवाक्यावर ‘फिनिक्स करियर डेव्हलपमेंट अकॅडमी’ नावाने वर्ध्यात क्लास सुरु केला. “मी वर्ध्याच्या भाषेत माझ्या क्लासमध्ये शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यावर अनेकांनी माझ्यावर टीका केली. मात्र माझे माझ्या वऱ्हाडी भाषेवर प्रेम असल्यामुळे मी  बोली भाषेत शिकवण्याचा प्रयत्न करतो, त्याला आमच्या इथले विद्यार्थी चांगला प्रतिसाद देत आहेत”, असे कारळे यांनी सांगितले.

 

सध्या कारळे यांचे वऱ्हाडी भाषेतील क्लासेसचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. बोली भाषेतील ठसकेबाज संवाद विद्यार्थी आणि इतरांनाही आकर्षित करत असल्याचे या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवरुन दिसून येत आहे.

First Published on: August 30, 2020 5:51 PM
Exit mobile version